माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवडणूक खर्चाच्या मुद्दय़ावर निवडणूक आयोगाने दोषी धरल्यानंतर २००९च्या विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्य़ामधील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अन्य सात उमेदवारांच्या निवडणूक खर्च लेख्यांची माहिती आयोगाने मागविली आहे. त्यामुळे नांदेडचे पालकमंत्री डी. पी. सावंत तसेच अन्य सहा आमदार चौकशीच्या कचाटय़ात सापडू शकतात!
डॉ. माधव किन्हाळकर विरुद्ध अशोक चव्हाण प्रकरणात निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ काळ चाललेल्या कायदेशीर लढाईत २००९च्या विधानसभा निवडणुकीतील चव्हाण यांच्या निवडणूक खर्चाच्या सत्यतेला आव्हान देण्यात आले होते. या खर्चात ३ स्टार प्रचारकांच्या नांदेड दौऱ्यात सभा-कार्यक्रमांच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या जाहिरातींवरील खर्च अंतर्भूत केला नाही, हा तक्रारकर्त्यांचा आक्षेप मान्य करून आयोगाने चव्हाण यांना नोटीस बजावली. त्याच वेळी मुक्त पत्रकार आनंद कुलकर्णी यांनी गेल्या १२ व १५ मे रोजी केलेल्या तक्रारीची दखल घेत, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत संबंधित उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा तपशील आयोगाने मागविला.
कुलकर्णी यांच्या निवेदनात डी. पी. सावंत (नांदेड उत्तर), ओमप्रकाश पोकर्णा (नांदेड दक्षिण), माधवराव जवळगावकर (हदगाव), हणमंतराव बेटमोगरेकर (मुखेड), रावसाहेब अंतापूरकर (बिलोली) तसेच श्रीनिवास देशमुख गोरठेकर (नायगाव), शंकर धोंडगे (लोहा-कंधार) व प्रदीप नाईक (किनवट) या उमेदवारांचा थेट उल्लेख होता. यातील गोरठेकरवगळता सर्व जण विधानसभेवर निवडून गेले.
आपल्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे व या अनुषंगाने आयोगाने स्थानिक प्रशासनाला माहिती (अहवाल) पाठविण्याचे आदेश दिले आहेत, याची संबंधित स्थानिक आमदारांना कल्पनाही नसल्याचे दिसून
आले.
जाहिरातीच्या खर्चावरुन कोंडी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यासह वरील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ नांदेडला जाहीर सभेत भाषण केले होते. या सभेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी २ ते ६ ऑक्टोबर २००९ दरम्यान काँग्रेसने विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केल्या. परंतु वरीलपैकी एकाही उमेदवाराने या जाहिरातींवर झालेला खर्च आपल्या निवडणूक खर्चाच्या लेख्यांत दाखविला नाही. किन्हाळकर विरुद्ध चव्हाण प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हाच मुद्दा महत्त्वाचा ठरला. या पाश्र्वभूमीवर आयोगाने चव्हाण यांच्यावर कलम १०(ए) खाली अपात्रतेची कारवाई केली, तर वर नमूद केलेले त्या वेळचे उमेदवारही गोत्यात येऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. या मुद्दय़ावर डॉ. किन्हाळकर यांनी थेट प्रतिक्रिया दिली नाही. आनंद कुलकर्णी यांनी योग्य वेळी योग्य मुद्दय़ावर तक्रार केली असल्याचे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2014 रोजी प्रकाशित
चव्हाणांपाठोपाठ नांदेडचे सात आमदारही गोत्यात?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवडणूक खर्चाच्या मुद्दय़ावर निवडणूक आयोगाने दोषी धरल्यानंतर २००९च्या विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्य़ामधील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अन्य सात उमेदवारांच्या निवडणूक खर्च लेख्यांची माहिती आयोगाने मागविली आहे.

First published on: 18-07-2014 at 03:48 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After ashok chavan seven congress ncp mla on radar of election commision