लोकसभेच्या मागील निवडणुकीत नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बलाढय़ उमेदवाराच्या नाकीनऊ आणणारे आणि शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर ढकलणारे विद्यमान नगरसेवक हेमंत गोडसे यांनी मनसेतून बाहेर पडताना स्थानिक नेत्यांच्या कार्यशैलीला लक्ष्य केले असले तरी गोडसेंसारखी क्रियाशील व्यक्ती पक्षात यावी यासाठी शिवसेनाही काही महिन्यांपासून गळ लावून बसली होती. शिवसेनेच्या या गळाला अखेर बडा मासा लागल्याने मनसेतील अंतर्गत वादविवाद तर जाहीर झालेच, शिवाय गोडसेंमुळे इतरही काही जण मनसेतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोडसे यांनी मनसेतून बाहेर पडताना पक्षात होणारी घुसमट आणि कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता होणारे निर्णय ही मुख्य कारणे दिली होती. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांना अनुकूल वातावरण तयार व्हावे यासाठी स्थानिक पातळीवर होत असलेल्या हालचाली हा मुद्दाही त्यांनी मांडला होता. पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर स्थानिक पातळीवर आ. गिते यांच्या विरोधकांनी तसेच मुंबईच्या काही नेत्यांनीही गोडसे यांच्याशी संपर्क साधत निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले. परंतु मनसे सोडण्याआधीच शिवसेनेत प्रवेश करण्याचे नक्की करणाऱ्या गोडसे यांनी फेरविचाराचा मुद्दा कधीच बाद केला होता. एकलहरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य असताना सुमारे १२ कोटी रूपयांची विकासकामे करणारा जिल्ह्यातील एकमेव सदस्य अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारे गोडसे यांना मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला तरी त्यांनी दिलेली झूंज सर्वाच्याच लक्षात राहिली. त्यामुळेच या पराभवानंतरही गोडसे यांच्यावर पक्षाची विशेष जबाबदारी सोपविण्यात येईल अशी अनेकांची अटकळ होती, परंतु तसे झाले नाही.
महापालिका निवडणुकीत मनसेची सत्ता आल्यानंतर महापौरपदासाठी आपण प्रबळ दावेदार राहू असे वाटत होते. परंतु आपणांस पध्दतशीरपणे बाजूला ठेवण्यात आले अशी सल गोडसे यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली. स्थायी समिती सभापतीपदासाठीही अर्ज भरण्यास सांगून नंतर माघार घेण्याचे फर्मावण्यात आले. स्थानिक नेतृत्वाकडून हे सर्व जाणीवपूर्वक करण्यात येत होते. त्यांच्याकडूनच राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली जात होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या नावाची चर्चा होईल अशी आशा होती. परंतु भुजबळांना निवडणूक सोपी जावी म्हणून इतर दोघांच्या नावांचा पक्षातर्फे विचार होऊ लागला आहे. एका विशिष्ट समाजाचे नेतृत्व जिल्ह्यावर कायम असावे यासाठी पक्षाचे स्थानिक नेतृत्व प्रयत्न करीत असल्याचा आरोपही गोडसे यांनी केला.
गोडसे यांच्यापाठोपाठ त्यांचे निकटवर्तीय जाणारे काही कार्यकर्तेही बाहेर पडण्याची चर्चा आहे. –
सेनेने खदखद ओळखली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ उमेदवाराच्या शोधात असलेल्या शिवसेनेने गोडसे यांच्या मनातील खदखद कधीच ओळखली होती. काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्याशी झालेल्या चर्चेत गोडसे यांच्या मनाची चाचपणी करण्यात आली होती. त्यानंतर उध्दव ठाकरे व गोडसे यांची मुंबईत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.या बैठकीनंतर मनसे सोडण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या एक दिवस आधी पुन्हा ठाकरे यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेत चर्चा केल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2013 रोजी प्रकाशित
शिवसेनेच्या गळाला मनसेचा मासा
लोकसभेच्या मागील निवडणुकीत नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बलाढय़ उमेदवाराच्या नाकीनऊ आणणारे आणि शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकावर ढकलणारे विद्यमान नगरसेवक हेमंत गोडसे यांनी मनसेतून बाहेर पडताना स्थानिक नेत्यांच्या कार्यशैलीला लक्ष्य केले असले तरी गोडसेंसारखी क्रियाशील व्यक्ती पक्षात यावी यासाठी शिवसेनाही काही महिन्यांपासून गळ लावून बसली होती.
First published on: 03-06-2013 at 03:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After hemant godse some more workers likely to be out from mns to join shiv sena