सातारा : हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सोलापूर येथे इम्तियाज जलील यांनी आरोप केले होते. त्याचा शिवसेना शिंदे पक्षाकडून सातारा येथे निषेध करण्यात आला. जलील यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत जिल्हाधिकारी कार्यलयासमोर पुतळ्याचे दहन करण्यात आले.
जलील यांनी सोलापूर येथे उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना मी मानतो. त्यांनी कधीच जातीय आधारावर राजकारण केले नाही. परंतु, त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी जातीच्या आधारावर राजकारण केले. महाराष्ट्रात पहिल्यांदा जातीच्या आधारावरचं राजकारण बाळासाहेबांनी सुरू केले, असे वक्तव्य केले होते. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असे आरोप करणे अत्यंत निंदनीय आहे. जनतेच्या मनात रोष निर्माण होणे स्वाभाविक आहे.
कारण इम्तियाज जलीलसारख्या माणसांचे असे विधान महाराष्ट्रातील हिंदूंच्या आणि मराठी माणसांच्या भावना दुखावणारे आहे. बाळासाहेबांनी या हिंदुस्थानात सर्व धर्मातील लोकांनाही न्याय दिला आहे. कित्येक जातीच्या लोकांना मोठे केले. अशा महान व्यक्तीवर बोलणाऱ्या जलील याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख रणजित भोसले, उपजिल्हा प्रमुख संदीप पवार, जिल्हा समन्वयक प्रदीप माने, वाई विधानसभा प्रमुख विकास शिंदे, शहरप्रमुख नीलेश मोरे, संभाजी पाटील, राजू केंजळे, रोहित कटके, रविंद्र भिलारे, संजय सुर्वे, शहर संघटक अमोल इंगवले, किरण कांबळे, अमोल खुडे, पवित चोरगे उपस्थित होते.