अकोले : अकोले तालुक्यातील देवठाण येथे एका तीन वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. कविता लहानू गांगड (वय ३) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तीन महिन्यात देवठाणमधील अशा प्रकारची ही दुसरी घटना. या घटनेमुळे देवठाण परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याला दोन दिवसात पकडले नाही तर वनखात्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त गावकऱ्यांनी दिला आहे.
या घटनेची समजलेली हकीगत पुढीलप्रमाणे, लहानू गांगड यांचे कुटुंब देवठाण शिवारात देवठाण -हिवरगाव रस्त्यावर राहते. मंगळवारी सायंकाळी त्यांची मुलगी कविता घराबाहेरील अंगणात एकटीच खेळत असताना, सायंकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान तेथे आलेल्या बिबट्याने मुलीला उचलून नेले. ही घटना समजताच लोकांनी तेथे धाव घेतली. रात्री उशिरा मुलीचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आढळून आला.
यापूर्वी ३० मे रोजी याच गावातील काळे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून किसनाबाई रामहारी काळे (वय ५७) या महिलेला गंभीर जखमी केले होते. उपचार सुरू असताना सुमारे पंधरा दिवसांनंतर त्यांचे निधन झाले. तेव्हा पिंजरे लावूनही वन विभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले होते. ही घटना ताजी असतानाच, काल सायंकाळी पुन्हा बिबट्याने या तीन वर्षीय मुलीला ठार केल्याने नागरिकांमध्ये वनखात्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आज सकाळी शोकाकुल वातावरणात बालिकेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांनी तेथे आलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दोन दिवसात त्या नरभक्षक बिबट्याला पकडले नाही तर वनखात्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. वनखात्याला जमत नसेल तर आम्हाला परवानगी द्या, आम्ही बिबट्यांचा बंदोबस्त करतो असे गावकऱ्यांनी वनअधिकारी यांना सुनावले. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्याचे जाणवत होते.
यापूर्वी जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पंधरा दिवसात दोघांचा बळी गेला आहे. एका मजुरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले होते. तर आई समोरून लहान मुलाला जबड्यात धरून उचलून नेले होते. या लहान मुलाचा मृतदेह नंतर आढळला. बिबट्यांच्या हल्ल्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात दहशत निर्माण झालेली आहे. अनेक दुभत्या जनावरांचाही बिबट्याने फडशा पाडला आहे.