अहिल्यानगर: यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता उद्या, शनिवारी अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. मिरवणुकीसाठी सार्वजनिक तरुण मंडळे आणि जिल्हा प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरातील उत्सव मूर्तीच्या उत्थापनाची पूजा उद्या सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते होणार आहे.
शहरात साडेतीनशेहून अधिक मंडळांनी मंडप टाकून श्रींची प्रतिष्ठापना केलेली असली, तरी प्रत्यक्षात उद्याच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत शहरातील केवळ १६ मंडळे सहभागी होणार आहेत. याशिवाय सावेडी उपनगरात प्रोफेसर कॉलनी चौकात मिरवणूक स्वतंत्र काढली जाईल. या मिरवणुकीत अवघी ५ सार्वजनिक मंडळे सहभागी होणार आहेत. केडगाव उपनगरातील मंडळांची एक दिवस आधीच म्हणजे आज, शुक्रवारी मिरवणूक काढली जाते.
श्री विशाल देवस्थानचा रथ रामचंद्र खुंटावर आल्यानंतर तेथून सकाळी ११ च्या सुमारास मुख्य मिरवणुकीस सुरुवात होईल. आडते बाजार- तेली खुंट- कापड बाजार- भिंगारवाला चौक- अर्बन बँक- नवी पेठ- चितळे रस्ता- दिल्ली गेट मार्गे नेप्ती नाका चौकातील बाळाजी बुवा विहिरीत मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होईल. सावेडी उपनगरातही प्रोफेसर कॉलनीतून मिरवणूक निघणार असली, तरी अनेक मंडळे स्वतंत्र मिरवणूक काढतात व यशोदानगरमधील सार्वजनिक विहिरीत विसर्जन करतात.
ध्वनीक्षेपक जप्त होणार
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी लेझर लाईट, कार्बन डायऑक्साइडचा वापर होणारे फवारे (स्मोकर), दबाव हॉर्न (प्रेशर मिड) यावर बंदी घातली आहे, तर मिरवणुकीत कर्णकर्कश आवाज करणारी डीजे सिस्टीम वाजवल्यास ती जप्त करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. लेझर लाईट प्रेशर मिड व स्मोकर यांचा ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती व लहान मुलांच्या आरोग्य व सुरक्षिततेवर गंभीर धोका होऊ शकतो, असे कारण बंदी घालण्यामागे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
१६७ समाजकंटक हद्दपार
गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलिसांनी शहर व परिसरातून एकूण १६७ समाजकंटकांना हद्दपार केले आहे, तर ५०० हून अधिक जणांना शांततेचा भंग न करण्याच्या मुद्द्यावर समज देणारी नोटीस पाठवली आहे.
टेहळणी मनोरे, ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे
शहरात अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीसाठी २ उपविभागीय अधिकारी, ११ निरीक्षक, २६ उपनिरीक्षक, ५३० पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे १५० जवान, एक आरसीपी, तीन आरपीएफ तुकड्या तैनात केल्या जातील. मिरवणूक मार्गावर वाहने, मोकाट जनावरे येऊ नयेत त्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी २६ टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत. याशिवाय दोन ड्रोन व ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे.
विसर्जन व्यवस्था
महापालिकेने शहरात बाळाजी बुवा विहीर (नेप्ती नाका), यशोदानगर (पाइपलाइन रस्ता), साईनगर (भोसले आखाडा), गांधीनगर (बोल्हेगाव), साईबाबा मंदिर (निर्मलनगर), सावेडी जॉगिंग ट्रॅक, आयुर्वेद महाविद्यालय चौक, सारसनगरमधील भिंगार नालाजवळ, शिवनेरी चौक (स्टेशन रस्ता, फकीरवाड्यातील मारुती मंदिर, भिस्तबाग महल, गांधी मैदान, बाजार समिती जवळील पांजरपोळ), सांस्कृतिक भवन (केडगाव देवी मंदिराशेजारी), भूषणनगरच्या पाण्याच्या टाकीजवळ विसर्जन करण्याची व्यवस्था केली आहे.
सहभागी मंडळे
शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी विशाल देवस्थानचा रथ, त्यानंतर संगम तरुण मंडळ, माळीवाडा मंडळ, दोस्ती, नवजवान, महालक्ष्मी, कपिलेश्वर, नवरत्न, समझोता, नीलकमल, शिवशंकर या १२ मंडळांसह शिंदे गट, दोस्ती मंडळ, आनंद मंडळ व ठाकरे गट अशी एकूण १६ मंडळे सहभागी होतील, तर सावेडी उपनगरात मोरया युवा प्रतिष्ठान (गुलमोहर रस्ता), राजाधिराज युवा प्रतिष्ठान (कुष्ठधाम रस्ता), अहिल्यादेवी विचार मंच (ढवण वस्ती), दोस्ती युवा प्रतिष्ठान (वैदुवाडी), उपनगरचा राजा (यशोदानगर) ही मंडळे सहभागी होतील.
धरण परिसरात विसर्जनास बंदी
जलसंपदा विभागाच्या धरणांमध्ये व जलाशयात गणेशमूर्ती विसर्जन करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. मूर्ती व निर्माल्यामुळे धरणातील पाणी प्रदूषित होते. पाणी खोल असल्याने अनेकदा अपघात होऊन जीवितहानीही झाली आहे. शिवाय लगतच्या भागात ध्वनी व वायुप्रदूषणाच्या तक्रारी ग्रामपंचायतींनी केल्या आहेत. धरणातील पाणी गावांमध्ये पिण्यासाठी वापरले जाते. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. धरण सुरक्षा व पुरनियंत्रण व्यवस्थेवरही परिणाम होतो. यामुळे नागरिकांनी धरण परिसर टाळून नगरपालिकांनी किंवा ग्रामपंचायतींनी केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.