अहिल्यानगर: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीने पाथर्डी, शेवगाव, जामखेड, अहिल्यानगर, कर्जत, श्रीगोंदा व राहाता या सात तालुक्यांत ४२३ गावांमधील ८४ हजार ८६० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका १ लाख १६ हजार ८४२ शेतकऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

शनिवारी व रविवारच्या अतिमुसळधार पावसाने काल, सोमवारी दुपारनंतर उघडीप दिली व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राथमिक पाहणी केली. त्यानंतर नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. सर्वाधिक शेवगाव तालुक्याला तडाखा बसला. १०४ गावे बाधित झाली. ३८ हजार ६२ हेक्टर क्षेत्रातील कापूस, तूर, उडीद, मूग, कांदा, बाजरी, सोयाबीन व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका ५६ हजार २७ शेतकऱ्यांना बसला आहे. या सर्वच शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

पाथर्डीतील १३७ गावांमधील १० हजार ९८६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ९ हजार ८२८ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. सर्वच क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे आहे. यात बाजरी, कापूस, तूर, मूग, उडीद, डाळिंब, संत्रा, सीताफळ या पिकांचा समावेश आहे. नगरमध्ये २३ गावांमधील ४ हजार ५४७ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कांदा, संत्रा, सीताफळ, बाजरी व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले, ५ हजार ३७६ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. हे सर्वच क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे, तर कर्जतमधील ६२ गावांमध्ये १ हजार २८९ हेक्टर क्षेत्रात २ हजार ६५१ शेतकऱ्यांचे कांदा, तूर, मका, बाजरी व फळपिकांचे नुकसान झाले आहे.

जामखेडमधील ८७ गावे, ४१ हजार २४० शेतकऱ्यांच्या २८ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, कांदा, उडीद, तूर, सूर्यफूल, बाजरी, केळी, लिंबू व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. श्रीगोंद्यातील ४ गावांमधील ७८ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, मका, कापूस, कांदा, उडीद या पिकांचे नुकसान झाले, १३२ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. राहात्यातील ८ गावांत १ हजार २३८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात १ हजार ५८७ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाने प्राथमिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच सर्व पंचनामे करण्यात येणार असून, त्यात प्रत्यक्ष नुकसानीची माहिती समोर येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.