अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. ही आनंदाची बाब आहे. शिक्षक संघटनांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी साहित्य संमेलन आयोजित करून त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.
जिल्हा प्राथमिक सहकारी शिक्षक बँकेच्या ॲपद्वारे ‘एनईएफटी’ व ‘आयएमपीएस’ या जलद आर्थिक व्यवहाराच्या सेवांचे उद्घाटन सीईओ भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे माजी अध्यक्ष शरद सुद्रिक होते.
यावेळी सीईओ भंडारी म्हणाले, आयुष्याला दिशा देण्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचा सर्वाधिक प्रभाव असतो. माझे शिक्षणही जिल्हा परिषद शाळेत झाले. जि. प. शाळेत सर्वसामान्यांची मुले शिकतात. त्यामुळे या शाळा समृद्ध झाल्या पाहिजेत. शिक्षणाधिकारी पाटील म्हणाले, मिशन आरंभ उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होत आहे. हेच विद्यार्थी येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी म्हणून देशाची सेवा करतील. बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब तापकीर यांनी बँकेच्या उपक्रमांची माहिती दिली.
राज्य शिक्षक संघाचे नेते दत्ता पाटील कुलट, पदाधिकारी गोकुळ कळमकर, राजेंद्र सदगीर, रविकिरण साळवे, अर्जुन शिरसाठ, बाबा खरात, बबन गाडेकर, संतोष दुसुंगे, राजेंद्र कुदनर, बाळासाहेब कदम, मुकेश गडदे, राजेंद्र विधाते, बँकेचे उपाध्यक्ष योगेश वाघमारे यांच्यासह संचालक व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आदर्श शाळेसाठी ६०१ शाळांची निवड
जिल्हा परिषदेच्या ‘माझी आदर्श शाळा’ या उपक्रमाच्या माध्यमातून १०० पेक्षा जास्त पट असलेल्या ६०१ शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळा सर्वच बाबतीत समृद्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला जाणार आहेत. या माध्यमातून प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेतच शिकवले पाहिजे, अशी भावना निर्माण व्हायला हवी, असे सीईओ भंडारे यांनी सांगितले.
अतिवृष्टीत वाहून गेलेली वरूर शाळा दत्तक घेणार
अतिवृष्टीमुळे वाहून गेलेली वरूर (ता. शेवगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व गुरूमाउली-सदिच्छा मंडळ, ही शाळा पुन्हा उभी करण्यासाठी जे शैक्षणिक साहित्य आवश्यक असेल ते सर्व आम्ही देऊ, असे शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी यावेळी जाहीर केले. राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या संजना चिमटे- अडसूळ, जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त सचिन ठाणगे, वर्षा भालसिंग- कासार व विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल बँकेचे माहिती माजी अध्यक्ष डॉ. संदीप मोटे पाटील यांचा सीईओ भंडारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.