अहिल्यानगर: राज्यातील वीज कंपन्यांच्या खासगीकरणास विरोध, निवृत्तिवेतन लागू करावे तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी, अभियंते व अधिकारी यांच्या सात संघटनांच्या कृती समितीने सुरू केलेल्या तीन दिवसांच्या संपास आज, गुरुवारपासून सुरुवात झाली. कृती समितीच्या वतीने अहिल्यानगरच्या महावितरण कार्यलयाबाहेर धरणे आंदोलनही सुरू केले आहे.

राज्यातील वीज कंपन्यांमधील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, सबॉर्डीनेट इंजिनियर असोसिएशन (मराविमं.), महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन, तांत्रिक कामगार युनियन या संघटनांनी संपात सहभाग घेतला आहे.

खासगीकरणासह महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध, महावितरण कंपनीचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्याच्या निर्णयाला विरोध, महापारेषण कंपनीमधील २०० कोटी रुपयांवरील प्रकल्प (टीबीसीबी) माध्यमातून भांडवलदारांना देण्यास विरोध व महापारेषण कंपनीचा शेअर मार्केटमध्ये ‘आयपीओ’च्या माध्यमातून समावेश करण्यास विरोध यांसह विविध मागण्या कृती समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

धरणे आंदोलनात महेश चाबुकस्वार, धीरज गायकवाड, राजेंद्र घोरपडे, सुशील तायडे, गणेश कुंभारे, गायकवाड डी.एस., राहुल वरंगटे, म्हस्के विजय, अनिल कुमार रोकडे, सतीश भुजबळ, धीरज भिंगारदिवे, रघुनाथ लाड आदींसह अभियंते, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान वीज कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याने त्यांनी विनाविलंब कामांवर रूजू व्हावे, असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले आहे.

कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या मागण्यांशी सुसंगत भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. तरीही सात वीज कर्मचारी संघटनांनी संपाला सुरवात केली आहे. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या महाराष्ट्र अतिवृष्टीच्या संकटातून सावरत आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत. दिवाळी सणही काही दिवसांवर आला आहे. पूर परिस्थितीच्या संकट काळात तसेच सणासुदीच्या दिवसांत तत्पर वीज सेवा देत नागरिकांना सहकार्य करावे असेही आवाहन महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांनी केले आहे.