अहिल्यानगर : जिल्हात रात्रभर व आज, रविवारी सकाळी जोरदार पावसाने झोडपल्याने अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीतील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या वसाहतींमधून पाणी घुसले आहे. जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहाता, शिर्डी भागातील अनेक रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत. जामखेडमध्ये घराची भिंत कोसळून एका वृध्देच मृत्यू झाला.
जिल्ह्याच्या बहुतांशी तालुक्यांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण ८८.८ मिमी पाऊस झाला. सर्वाधिक राहातामध्ये १५०, श्रीरामपूरमध्ये १०२,कोपरगाव ११३, नेवासा ११९, नगर ९१.९ जामखेड ९२, पाथर्डी ९३, राहुरी ९५, अकोले ४१, संगमनेर ५१, कर्जत ६०.०, श्रीगोंदे ४९.४ व पारनेर ५८.२ मिमी. पाऊस झाला आहे. मुळा धरणातून विसर्ग वाढवून तो १५ हजार क्युसेक करण्यात आला आहे. तसेच निळवंडे धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या आठवड्यातच जिल्ह्यातील विविध भागांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. आता पुन्हा अतिवृष्टी झाल्याने शेतीपिके पुन्हा एकदा खालील पाण्याखाली गेली आहेत. नदी, ओढे, नाल्यांना आलेल्या पुराने काही ठिकाणी शेती खरवडून गेली आहे.
नगर शहर व परिसरात काल (शनिवारी) सायंकाळपासून सुरू झालेला जोरदार पाऊस रात्रभर सुरूच होता. आज, रविवारी सकाळी त्याचा जोर ओसरला. शहरातील शहरातून वाहणाऱ्या सीना नदीतून वाहणाऱ्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सीनाकाठी असलेल्या बागरोजा हडको, कल्याण रस्त्यावरील वसाहती, पुणे मार्गावरील रवीश हाउसिंग सोसायटी, सारसनगरमधील वसाहतींमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिक व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर-कल्याण महामार्गवर सीना नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद पडली आहे.
जामखेड, तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथे पावसाने घराची भिंत कोसळून पारूबाई किसन गव्हाणे या ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. राहता तालुक्यातील २७७ नागरिकांना पुराच्या पाण्यामुळे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. पाथर्डीतील करंजी गावात घाटावरून कोसळणारे पाणी घुसल्याने करंदी गाव जलमय झाले आहे.