अहिल्यानगर: एसटी बसमधील सहप्रवासी तरुणीने महिला प्रवाशाकडील ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील जुने बसस्थानक ते तारकपूर बसस्थानक दरम्यान घडली. यासंदर्भात तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सण-उत्सव काळात एसटी बसमधून चोऱ्या होण्याचे घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोतवाली पोलिसांनी यापूर्वी शहरातील तिसऱ्या- पुणे बसस्थानकावर महिला चोरांची टोळी अटक केली. मात्र नंतरही बसमधील चोऱ्यांच्या घटनांमध्ये खंड पडलेला नाही.

शहरात एसटी महामंडळाची तीन बस स्थानके आहेत. जुने मध्यवर्ती बस स्थानक, पुणे बसस्थानक व तारकपूर बसस्थानक अशी तीन स्थानके आहेत. सध्या जुन्या मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत पाडून तेथे नवीन बसस्थानकाची उभारणी सुरू आहे मात्र हे काम रखडलेले आहे. या ठिकाणी येणाऱ्या एसटी बस पुणे बसस्थानकाकडे वळवण्यात आल्या आहेत. पुणे बस स्थानकावरच प्रवाशांच्या लुटीच्या घटना अधिक घडत आहेत.

दागिने चोरीच्या घटनेसंदर्भात सुहासिनी पंडित अडोळे (वय ४८, रा. पोलीस कॉलनी, बोल्हेगाव, नगर) यांनी तोफखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सुहासिनी आडोळे या आपल्या पतीसह सोलापूर येथून अहिल्यानगरकडे येणाऱ्या एसटी बसमधून प्रवास करीत होत्या. सुहासिनी पाडोळे यांच्या मुलाने दिलेले दागिने त्यांनी बॅगमध्ये ठेवले.

बस शहरातील जुन्या बसस्थानकात आली. यावेळी तोंडाला पांढरा स्कार्फ बांधलेली व हिरवी साडी नेसलेली एक २०-२२ वर्षांची तरुणी बसमध्ये चढली. तिने सुहासिनी आडोळे यांच्या पतीला मळमळ होत असल्याचे कारण सांगून जागा बदलण्याची विनंती केली. त्यानंतर संशयित तरुणी सुहासिनी आडोळे यांच्या शेजारी बसली. १५ मिनिटांतच एसटी बस तारकपूर स्थानकावर येताच ती तरुणी घाईघाईने बसमधून उतरून निघून गेली.

त्यानंतर सुहासिनी आडोळे घरी पोचल्यावर त्यांनी बॅगेची तपासणी केली असता, त्यात ठेवलेले ८ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळले. बसमधील प्रवासादरम्यानच त्याच स्कार्फधारी तरुणीने दागिने लंपास केल्याचा संशय सुहासिनी आडोळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीमध्ये व्यक्त केला आहे. तोफखाना पोलिसांनी वर्णनावरून संशयित तरुणीचा शोध सुरू केला आहे.

जुन्या मध्यवर्ती बस स्थानकावर पोलीस चौकी होती. दुसऱ्या तारकपूर बस स्थानिकांमध्येही पोलीस चौकीसाठी जागा आहे. मात्र पुणे बस स्थानकावर पोलीस चौकीसाठी जागा नाही. तेथे पोलीसांनी गस्तही ठेवावी अशी प्रवाशांची मागणी आहे.