अहिल्यानगर : महापालिकेचे विविध ठिकाणचे गाळे व वर्गखोल्यांची थकबाकी २५ कोटींवर पोहोचली आहे. वारंवार नोटीस बजावूनही गाळेधारक थकबाकी भरत नसल्याने मनपाने कारवाईस सुरुवात केली आहे. गंज बाजारातील गाळेधारक व ओटेधारकांकडे सुमारे ३ कोटींची थकबाकी आहे. तेथील १४१ गाळे व ओटेधारकांपैकी ६५ जणांना जप्तीची नोटीस बजावली आहे. मनपाचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली.
गंज बाजार भाजी मार्केट व व्यापारी गाळ्यांमध्ये १४२ गाळेधारक व ओटेधारक आहेत. त्यातील एका गाळ्याची हस्तांतरण प्रक्रिया झालेली आहे. उर्वरित १४१ गाळेधारकांचे करारही संपुष्टात आलेले आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस मनपाने कारवाई सुरू केल्यामुळे गाळेधारकांनी पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, अद्यापही येथील गाळेधारकांकडे ३ कोटींची थकबाकी आहे.
मनपाने एप्रिल व मे महिन्यात सर्वेक्षण केले. त्या वेळी ही माहिती संकलित करण्यात आली. गाळेधारक वारंवार संधी देऊनही थकबाकी भरत नसल्याने गाळे ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. कारवाई झाल्यानंतर हे गाळे पुन्हा लिलाव करून दिले जाणार आहेत. १४१ पैकी सुमारे ८० ओटेधारक व इतर गाळेधारक आहेत. यातील ६५ जणांना महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ८१ ब नुसार जप्तीची नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत पूर्ण थकबाकी न भरल्यास जप्ती कारवाई करून ओटे व गाळे ताब्यात घेण्यात येणार आहेत. थकबाकी भरण्याची वारंवार संधी देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने कारवाईशिवाय पर्याय नसल्याचे आयुक्त डांगे यांनी सांगितले.
मनपा अधिनियम व राज्य शासनाच्या निर्देशानुसार भाडे आकारणी केली जात आहे. नवीन करारनामे व भाडे आकारणी नियमानुसार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने गंज बाजारातील थकबाकीदार गाळेधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या असल्या तरी शहराच्या इतर भागातील अनेक थकबाकीदार गाळेधारकांना मात्र अद्याप नोटीस बजावलेल्या नाहीत. याशिवाय अलीकडच्या काळात शहराच्या विविध भागात विशेषत: उपनगरांमध्ये ‘पत्रा मार्केट’ नावाची नवीन संकल्पना उदयास आली आहे. मोकळ्या जागेत पत्र्याचे गाळे उभारून दुकाने सुरू करण्यात आले आहेत.
मध्यंतरी मनपाने केलेल्या सर्वेक्षणात असे पात्र मार्केटचे सुमारे ३ हजारावर गाळे आढळले होते. या पत्रा मार्केट मधील गाळेधारकांना कोणतीही कर आकारणी केली जात नाही. मात्र या पात्र मार्केटमुळे वाहतुकीस मोठा अडथळा होतो. काही ठिकाणी आग लागण्याच्या घटनाही घडल्या. असे पात्र मार्केट हटवण्याचे यापूर्वीच्या मनपा आयुक्तांनी जाहीर केले होते. मात्र ही कारवाई प्रत्यक्षात झालीच नाही.