अहिल्यानगर: महापालिकेची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश देण्यात आल्याने मनपाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजल्याचे मानले जाते. प्रभागांच्या व नगरसेवकांच्या संख्येत बदल होणार नसला तरी प्रभागांच्या सीमारेषा कशा पद्धतीने निश्चित केल्या जातात, याकडे इच्छुक उमेदवारांची लक्ष राहणार आहे. तोच कळीचा मुद्दाही ठरणार आहे.

महापालिकेची मुदत संपून सुमारे दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. आता निवडणुकीसाठी राज्य सरकारने प्रभाग महापालिकेला प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ३ लाख ४० हजार ७५५ होती. त्यानुसार १७ प्रभागात प्रत्येकी चार असे ६८ नगरसेवक होते. ही संख्या कायम राहणार आहे. मागील निवडणुकीत ज्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली, तेच निर्देश यंदाही देण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन रचनेतही बहुतांशी प्रभाग तसेच राहण्याची शक्यता आहे. मात्र प्रभागात समाविष्ट क्षेत्रात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र वगळणे वा जोडणे यासाठी राजकीय प्रभाव प्रशासनावर पाडण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या सुचनेनुसार प्रभाग रचनेची सुरुवात उत्तरेकडून म्हणजेच शहराच्या सावेडी, भिस्तबागकडून करण्यास होणार आहे. त्यामुळे मागील वेळेप्रमाणे तोच प्रभाग १ असेल. प्रभाग रचनेची अखेर केडगावमध्ये होईल. त्यामुळे तेथे शेवटचा प्रभाग असेल. एकूण लोकसंख्या, नगरसेवकांची संख्या व प्रत्येक भागाचे सदस्य यानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या सुमारे २० हजार असण्याची शक्यता आहे.

प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश असले तरी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत अद्याप जाहीर झालेली नाही. यापूर्वी निवडणुकीच्या आधी एक ते दीड वर्ष ही सोडत काढून आरक्षण जाहीर केले जात असे. यंदा मात्र अद्याप सोडत काढण्यात आलेली नाही.

मतदार संख्येत वाढ

प्रभाग रचना करताना सन २०१२ ची जनगणना विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मतदार संख्येतही वाढ झालेली आहे. मागील मनपा निवडणुकीत २ लाख १४ हजार ६५० मतदार होते. गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३ लाख १९ हजार मतदार होते. विधानसभेसाठी भिंगार व बुरुडगावची मतदारसंख्या जोडली होती. ती मनपा निवडणुकीसाठी वगळली जाईल. त्यामुळे लोकसंख्या कमी परंतु मतदारअधिक असा विरोधाभास निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची नियुक्ती

प्रभाग रचना तयार करण्यासाठी मनपा उपायुक्त विजयकुमार मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या समितीत नगररचना, संगणक व निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही सर्व तयारी सुरू असली तरी अद्याप प्रभाग रचनेचा प्रत्यक्ष कार्यक्रम राज्य सरकारने जाहीर केलेला नाही. त्यामुळे पूर्वतयारी सुरू करण्यात आलेली आहे.