अहिल्यानगर: महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम करून ती प्रसिद्ध करण्याची मुदत काल, सोमवारपर्यंत होती. मात्र मनपा प्रशासनाकडून आज, मंगळवारी सायंकाळपर्यंत ती प्रसिद्ध करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रभाग रचनेबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. प्रभाग रचना अंतिम करण्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग रचना अंतिम करण्यात महायुतीमध्ये ओढाताण सुरू आहे. राष्ट्रवादी-भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असे वातावरण निर्माण झाले आहे.
मनपाची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यासाठी मनपा आयुक्त यशवंत डांगे व इतर अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र आपापल्या सोयीनुसार प्रभाग रचना असावी यासाठी महायुतीमधील पक्षातच रस्सीखेच सुरू झाली आहे. नगरविकास खाते शिवसेना शिंदे गटाकडे आहे, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अहवालात बदल करायचा असल्यास त्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले जाते. त्यापूर्वी आपापल्या सोयीनुसार प्रभाग रचना असावी यासाठी गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे काही पदाधिकारीही मुंबईत तळ ठोकून होते. उपलब्ध माहितीनुसार ९, ११, १२, १५ या प्रभागांची रचना वादाची ठरली आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्याची सुनावणी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतली व अहवाल राज्य सरकारकडे पाठवला. राज्य सरकारकडून तो राज्य निवडणूक आयोगाकडे धाडला जाणार होता. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची मुदत दि. ९ पासुन कालपर्यंत होती. मात्र आज सायंकाळपर्यंत ती प्रसिद्ध करण्यात आली नाही.
यासंदर्भात मनपा आयुक्त डांगे यांच्याशी संपर्क सायंकाळी संपर्क केला असता त्यांनी सायंकाळी उशिरा अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल, असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात रात्री ८ पर्यंत प्रसिद्ध झालेली नव्हती.
न्यायालयात दाद मागू- गिरीश जाधव
दरम्यान या संदर्भात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की सत्ताधाऱ्यांना आपले उमेदवारांना सोयीस्कर ठरतील अशा पद्धतीने प्रभागांचे फेरबदल करण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. निवडणूक आयोगाने ठरवलेल्या मुदतीनंतरही प्रभाग रचना बदलण्याचे प्रकार सुरू आहेत. मुळात निकषानुसार प्रभाग रचना झालेली नाही. विद्यमान विरोधी पक्षाच्या उमेदवारांना गैरसोयीचे होईल अशा प्रकारे प्रभाग तयार करण्यात आले आहेत. भाजप राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाच्या सल्ल्यानुसार रचना करण्यात आली आहे. प्रभाग रचना ही सर्व पक्षांसाठी समान न्याय तत्त्वावर केली पाहिजे. परंतु सध्याची रचना मनमानी पद्धतीने, लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर घाला घालणारी आहे, असा आरोपही त्यांनी केला.
निवडणूक ताब्यात घेण्याचे प्रयत्न- किरण काळे
दरम्यान ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी आयोगाच्या वेळापत्रक महायुती सरकार व आयोगाने स्वतःच मोडीत काढल्याचा आरोप केला आहे. निवडणूक ‘मॅनेज’ करण्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारचा राजकीय हस्तक्षेप सुरू आहे. त्यामुळे जुनी प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पराभावाच्या धास्तीमुळे ठाकरे गटाचे बालेकिल्ले असणारे प्रभाग तोडण्यात आले आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे तसेच निवडणूक आयोग, नगर विकास विभाग, राज्य सरकार यांचे संगणमत सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.