अहिल्यानगर : महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येकी ४ सदस्यांचे १७ प्रभाग असलेली प्रारूप प्रभाग रचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार बुधवारी प्रसिद्ध केली. यात बोल्हेगाव, भिस्तबाग, पाइपलाइन रस्ता, तसेच, केडगाव, बुरुडगाव रोडवरील प्रभागांमध्ये मागील प्रभागांच्या तुलनेत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. मात्र, मध्य शहरातील प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रस्थापित नगरसेवकांसह इच्छुकांनाही नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. दरम्यान प्रत्येक निवडणुकीपूर्वी महापौर पदासाठी आरक्षण निश्चित केले जाते. यंदा अद्यापही महापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले नाही.

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जनगणनेचे प्रगणक गट न तोडता प्रभाग रचना करण्यात आली असली, तरी काही प्रभागांची रचना नदी, ओढे, महामार्ग ओलांडून करण्यात आली आहे. यात प्रभाग ४ सर्वाधिक लोकसंख्येचा, तर प्रभाग १५ सर्वांत कमी लोकसंख्येचा करण्यात आला आहे. प्रभाग रचनेत कल्याण रोड, तोफखाना, सर्जेपुरा, मंगलगेट, झेंडीगेट, नालेगाव, माळीवाडा, दिल्लीगेट, लालटाकी या मध्य शहरातील प्रभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. तर, सावेडी उपनगरांतील सिव्हिल हडको, प्रोफेसर चौक, कुष्ठधाम रोड, झोपडी कॅन्टिन परिसर, कोठला या भागांचा समावेश असलेल्या प्रभागातही लक्षणीय बदल करण्यात आले आहेत. मध्य शहरातील प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रस्थापित नगरसेवकांसह इच्छुकांनाही नवीन प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.

मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध

राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर आयुक्त यशवंत डांगे यांनी महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तसेच प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा व प्रभागांची व्याप्ती, नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रभाग रचनेवर सूचना किंवा हरकती असल्यास १५ सप्टेंबरपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

महापौर व प्रभाग आरक्षण प्रलंबित

प्रत्येक निवडणुकीपूर्वी महापौर पदासाठी आरक्षण निश्चित केले जाते. यंदा अद्यापही महापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले नाही. तसेच, प्रभाग रचनेचा कार्यक्रम प्रसिद्ध करताना त्यात आरक्षण निश्चितीबाबत कार्यक्रम प्रसिद्ध केला जातो. मात्र, यावेळी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून, अद्याप आरक्षणाबाबत कार्यक्रम जाहीर झालेला नाही.