अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पूर्वतयारीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष या पदांच्या आरक्षणापाठोपाठ आज, मंगळवारी पंचायत समित्यांच्या सभापतिपदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. सन १९९६ ते २०१९ दरम्यानचे आरक्षण विचारात घेऊन चक्रानुक्रमे सोडत काढण्यात आली. १३ ऑक्टोबरला जि. प. गट व पं. स. गणाचे आरक्षण सोडतीद्वारे काढले जाणार आहे.

आज पं. स. सभापतिपदासाठी निघालेल्या आरक्षणात नगर, कोपरगाव, राहाता, जामखेड, पारनेर व श्रीगोंदा येथे महिलराज निश्चित झाले. चक्रीय आरक्षणात यापूर्वीचे आरक्षण विचारत घेऊन नवे आरक्षण निश्चित करण्यात आले. अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने अकोल्याचे सभापतिपद राज्य सरकारने अनु. जमाती (व्यक्ती) राखीव केलेले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत उपजिल्हाधिकारी शारदा जाधव, तहसीलदार शरद घोरपड, महसूल अधिकारी नीता कदम यांनी सोडतीची प्रक्रिया राबवली. बोल्हेगाव येथील शयन शादाब पटेल या चार वर्षांच्या मुलाच्या हस्ते सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.

सुरुवातीला अनुसूचित जमातीचे आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने काढण्यात आले. उर्वरित १३ सभापतिपदांचे उतरत्या क्रमाने लोकसंख्या व चक्रीय पद्धतीने आरक्षणाचा विचार करून अनुसूचित जातीसाठी संगमनेर व पाथर्डी सभापतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यात पाथर्डी सभापती हे महिलासाठी निश्चित केले. कोपरगावचे सभापतिपद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. पाथर्डीचे पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी, तर संगमनेरचे अनुसूचित जातीसाठी (व्यक्ती) राखीव ठेवण्यात आले आहे.

कोपरगाव, पाथर्डी, संगमनेरवगळून उर्वरित ठिकाणी चक्रीय पद्धतीने नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले. नागरिकांचा मागस प्रवर्गाचे आरक्षण काढताना राहुरी, राहाता, पारनेर, नेवासा, श्रीगोंदा, अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, जामखेड या नऊसाठी चिठ्ठ्या डब्यात टाकण्यात आल्या. त्यातून नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चार चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात राहाता, नेवासा, कर्जत व जामखेडच्या चिठ्ठ्या निघाल्या. त्यातून राहाता व जामखेड या दोन चिठ्ठ्या काढून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित करण्यात आला.

त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गाची सोडत काढण्यात आली. त्यासाठी श्रीरामपूर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, शेवगाव, अहिल्यानगर या ६ चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यातून तीन महिला राखीवसाठी चिठ्ठ्या काढल्या. पारनेर, अहिल्यानगर व श्रीगोेंदा हे तीन सभापतिपद महिलांसाठी राखीव झाले.

श्रीरामपूर ठरले लकी

श्रीरामपूरचे सभापतिपद सर्वसाधारण व्यक्तीसाठी निश्चित झाले आहे. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने हा तालुका नागरिकांचा मागास प्रवर्गात चार वेळा आरक्षित झाल्याने यंदाच्या चक्रीय पद्धतीनुसार तो वगळला गेला. त्यामुळे सभापतिपद यंदा सर्वसाधारण व्यक्तीसाठी निश्चित झाले.

सभापतिपदाचे आरक्षण

  • अकोले- अनुसूचित जमाती,
  • संगमनेर- अनुसूचित जाती,
  • कोपरगाव- अनुसूचित जमाती (महिला),
  • कर्जत – ना.मा.प्र.,
  • राहाता- ना.मा.प्र (महिला),
  • श्रीरामपूर- सर्वसाधारण,
  • नेवासा- ना.मा.प्र.,
  • शेवगाव- सर्वसाधारण,
  • पाथर्डी- अनुसूचित जाती (महिला),
  • राहुरी- सर्वसाधारण,
  • अहिल्यानगर- सर्वसाधारण (महिला),
  • जामखेड- ना.मा.प्र (महिला),
  • श्रीगोंदा- सर्वसाधारण (महिला),
  • पारनेर- सर्वसाधारण (महिला)