अहिल्यानगर/ अकोले: नगर शहर व परिसराला मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. अकोल्यातही पावसाने दुपारनंतर व पुन्हा रात्री हजेरी लावली. पावसाने लक्ष्मीपूजनासाठी सजलेल्या बाजारपेठेच्या उत्साहावर पाणी टाकले.
काही दिवसांपूर्वीच जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले. बाजारपेठेवरही परिणाम झालेला होता. अशातच ऐन दिवाळीच्या दिवशी पाऊस झाल्याने नागरिकांच्या उत्साहावरही पाणी पडले आहे. आज सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. सकाळी साडेदहा अकराच्या सुमारास काळ्या ढगांनी आकाश व्यापून गेले. साडेबाराच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. नगर शहरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस एक-दीड तास सुरू होता. त्यामुळे लक्ष्मीपूजनाचे साहित्य घेऊन रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांना त्याचा फटका बसला. काही वेळातच रस्ते ओस पडले. केवळ विक्रेते रस्त्यावर राहिले होते. त्यामुळे फुलांच्या भावातही आणखी घसरण झाली.
रात्री साडेआठच्या सुमारास नगर शहर परिसरास वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. वारे जोरदार वाहत होते. विजांचा कडकडाटही सुरू होता. काही क्षणातच जोरदार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे रस्ते जलमय झाले. लक्ष्मीपूजन करून फटाके उडवण्यासाठी नागरिक रस्त्यावर आलेले होते. त्यांना आपला उत्साह आवरता घ्यावा लागला.