अहिल्यानगर: श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये पोलिसांनी पकडलेल्या सुमारे १४ कोटी रुपयांच्या अमली पदार्थाच्या गुन्ह्यात अभियांत्रिकीचे उच्चशिक्षण घेतलेल्या तसेच पीएचडी केलेल्या औषध कंपनीच्या मालकाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी यासंदर्भात माहिती दिली. श्रीरामपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एमआयडीसी परिसरात १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीची अल्प्राझोलम पावडर व ही पावडर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त केला होता. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत आणखी दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली. हे दोघेही तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यातील एक अमर देशमुख (रा. कराड, सातारा) याला अटक करण्यात आली. श्रीरामपूर न्यायालयाने त्याला ४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती उपअधीक्षक शिवपुजे यांनी दिली.
या प्रकरणात सुरुवातीला टेम्पो चालक मिनीनाथ विष्णू राशिनकर (धनगरवाडी, राहाता) याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सागर भुसारी (रा. धनगरवाडी) याला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत विश्वनाथ कारभारी शिपणकर (दौंड, पुणे) व अमर देशमुख यांची नावे पुढे आली. यातील भुसारी याने राहुरीतून यांत्रिकी अभियंता तर शिपणकर याने लोणीमध्ये रसायन अभियंता तर देशमुख याने रसायन अभियंतासह पीएचडीही पूर्ण केली आहे. त्याची कराडमध्ये औषध कंपनी आहे.
अल्प्राझोलम तयार करण्याचे पाच टप्पे आहेत. त्यातील चार टप्पे कराड येथील कंपनीत पूर्ण केले जात होते. पुढचा पाचवा टप्पा पावडरपासून स्फटीके बनवण्यासाठी ते श्रीरामपूरच्या प्रकल्पात आणली जात होती. यासाठी ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीरामपूर एमआयडीसी शिपणकर याने भूखंड क्रमांक १९५ ए खरेदी केला होता. त्यानंतर फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष उत्पादन सुरुवात करण्यात आली. तेथे तयार झालेला माल भुसारी हा राशिनकरच्या माध्यमातून तेलंगणात पाठवत असे. यासाठी त्याला देशमुख कडून सूचना मिळायच्या. तेलंगणात देशमुख हा माल वितरित करीत असे. या स्फटीकाचा वापर कृत्रिमरित्या ताडी तयार करण्यासाठी होतो. ही ताडी तेलंगणात मोठ्या प्रमाणात विकली जाते.
देशमुख व शिपणकर यांना तेलंगणात माल विक्री करताना तेलंगणा पोलिसांनी अटक केली. त्याची माहिती मिळाल्यानंतर देशमुख याला श्रीरामपूरच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले असून शिपणकर याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे उपअधीक्षक डॉ. शिवपुजे यांनी सांगितले.