अहिल्यानगर : सोनई (ता. नेवासा) येथे मातंग समाजाच्या तरुणावर हल्ला करून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विविध पक्षांसह आंबेडकरी चळवळीतील संघटनांच्या शिष्टमंडळांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट व अजित पवार गट, आरपीआय आठवले गट यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
सोनई येथे गेल्या रविवारी ही घटना घडली. या संदर्भात पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यामध्ये जखमी झालेला संजय नितीन वैरागर सध्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहे. शिष्टमंडळाने त्याची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
वैरागर याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्याच्या पायावरून गाडी घालण्यात आली, त्याच्या डोळ्यात चाकू खुपसण्यात आला, तसेच त्याच्या अंगावर गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींनी लघुशंका केल्याचा आरोप केला जात आहे. सोनई पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही वैरागर याच्यावर हल्ला करण्याची घटना घडल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
आंबेडकरी, मातंग समाजाच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधी सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, अंकुश मोहिते, अजय साळवे, किरण दाभाडे, अमित काळे, किरण गायकवाड, विशाल गायकवाड, सुनील सकट, विनोद दिवटे, सागर ढगे, संजय चांदणे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले, तर आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, दया गजभिये, युवराज साखरे, निखिल सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पवार, अजय पाखरे, रवी सूर्यवंशी, अमर बेडेकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
याच मागणीसाठी शरद पवार गटाचे पदाधिकारी पंडित कांबळे, अशोक बागुल, विकास उडानशिवे, नलिनी गायकवाड, अथर खान, प्रशांत दरेकर, सोफीयान रंगरेज, रोहन शेलार, अल्तमज जरीवाला, प्रमोद आढाव, सचिन नवगिरे यांनीही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत जातीयवादी गावगुंडांवर कठोर कारवाईची मागणी केली.
