अहिल्यानगर: महापालिकेच्या आरोग्य विभागातील अपहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातून निलंबित वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे नाव वगळण्याचा कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांचा अहवाल न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी यासंदर्भातील आदेश दिला आहे.
सरकारी वकील अमित यादव यांनी ही माहिती दिली. न्यायालयाच्या आदेशामुळे डॉ. बोरगे यांचा गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश असणार आहे. या संदर्भात पुढील सुनावणी २७ जूनला होणार आहे. डॉ. बोरगे यांना समन्स बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
मनपाचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. बोरगे यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले होते. चौकशी समितीच्या अहवालानंतर आरोग्य विभागात १६.५० लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांकडे डॉ. बोरगे व राष्ट्रीय आरोग्य अभियानचे लेखाव्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात प्रभारी वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बोरगे व रणदिवे या दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यात बोरगे यांचा सहभाग आढळून आला नाही. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्या इतका पुरावा नाही, त्यामुळे त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळावे असा अहवाल तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक दराडे यांनी न्यायालयात सादर केला होता.
न्यायालयात सुनावणीवेळी फिर्यादी राजूरकर यांनाही म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले होते. ‘डिजिटल की’साठी वापरले गेलेले दोन्ही मोबाईल क्रमांक रणदिवे यांचे असले तरी या व्यवहाराबाबत डॉ. बरगी यांना माहिती होती, त्यांनी प्रस्तावावर सही केली, निधी प्राप्त झाल्यापासून ते पैसे काढण्याच्या कालावधीत ते कार्यरत होते. यासंदर्भात त्यांनी रणदिवे यांच्यावर कारवाई केली नाही, असे म्हणणे मनपाच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने डॉ. बोरगे यांचे नाव वगळण्याचा अहवाल अमान्य केला.