कराड : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी दोनशे टन ऊस उत्पादन शक्य असल्याचे मत कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे मृदा शास्त्रज्ञ व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. विवेक भोईटे यांनी व्यक्त केले. सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि सह्याद्री कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, जशराज पाटील आदींची उपस्थिती होती.

डॉ. भोईटे म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान ऊस लागवडीसाठी रोपांचा वापर, पिकाची अन्नद्रव्यांची गरज, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन करते. यामुळे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे शक्य आहे. सध्या शेतकरी लागवडीनंतर साडेतीन ते चार महिन्यांपर्यंत उसाची काळजी घेतात. परंतु, त्यानंतर फक्त पाणी देतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पिकाची भूक, अन्नद्रव्यांचा पुरवठा आणि उतारा (रिकव्हरी) याबाबत अचूक माहिती मिळते. त्यांनी नमूद केले की, अतिपाण्यामुळे जमीन नापीक होते, अति खतामुळे नव्हे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये खर्चात उत्पादन वाढवता येते.’ बाळासाहेब पाटील म्हणाले की, ‘साखर हा आता उपपदार्थ बनत चालला आहे. केंद्र सरकारची धोरणे साखर उद्योगाला अनुकूल नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्याशिवाय पर्याय नाही. जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे, पण एआयच्या मदतीने ऊस उत्पादन वाढवणे शक्य आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेळाव्यात शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराद्वारे ऊस शेतीत नावीन्यपूर्ण बदल आणि उत्पादनवाढीच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी अधिकारी वसंतराव चव्हाण, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील राठोड यांची उपस्थिती होती.