scorecardresearch

मलिकांच्या अटकेनंतर मोदींना भेटण्याची तत्परता का नाही? संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का?; शरद पवारांना नेत्याचा सवाल

“नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का?,” मोदी भेटीवरुन शरद पवारांना नेत्याचा सवाल

AIMIM, Imtiaz Jaleel, NCP, Sharad Pawar, Shivsena, Sanjay Raut, Nawab Malik
"नवाब मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे आहेत का?"

महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रामुख्याने संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचं शरद पवार यांनी मोदींना सांगितलं. शरद पवारांनी यावेळी नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित केला नसल्याचंही सांगितलं. दरम्यान संजय राऊतांच्या अटकेनंतर इतक्या घाईने पंतप्रधानांसमोर मुद्दा उपस्थित करणाऱ्या शरद पवारांना नवाब मलिकांपेक्षा ते जास्त महत्वाचे वाटतात का? अशी विचारणा एमआयएमने केली आहे.

राज्यातील मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधातही ‘ईडी’ आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. या नेत्यांवरील कारवाईबद्दल विचारले असता, त्यांच्याबद्दल मोदींशी चर्चा केली नाही, असं पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. पण, केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करणार असतील तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल, असंही पवार म्हणाले.

‘ईडी’ची तक्रार पंतप्रधानांकडे!; संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत शरद पवारांची नाराजी

दरम्यान एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शरद पवारांनी संजय राऊतांचा मुद्दा पंतप्रधानांसोबत चर्चेस नेल्याने भुवया उंचावल्या आहेत. “शरद पवारांनी इतकी घाई त्यांच्या पक्षाचे नवाब मलिक अटक झाल्यानंतर का दाखवली नाही?”, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “फक्त संजय राऊतांबद्दल चर्चा? का? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा तुम्हाला इतक्या गडबडीत मोदींशी चर्चा करावीशी वाटली नाही? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे खेळण्यासाठी स्वतःचे खेळ आहेत”.

मोदी-पवार भेटीमुळे दिल्लीसह महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले होते. मात्र, ‘राज्यातील सरकार भक्कम असून, आगामी विधानसभा निवडणुकीतही तिन्ही घटक पक्ष एकत्र लढतील’, असा निर्वाळा पवार यांनी दिला.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याआधी शरद पवार यांनी मोदी यांच्याशी ४० मिनिटे चर्चा केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी सहकार क्षेत्राशी निगडीत प्रश्नांसंबंधी पवारांनी मोदींची भेट घेतली होती. मात्र, राज्यातील ‘ईडी’च्या वेगवान कारवायांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याच्या ‘ईडी’च्या कारवाईबद्दल पवार यांनी पत्रकार परिषदेत कमालीची नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा मुद्दा मोदींच्या भेटीत उपस्थित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्याची काय गरज होती? ते भाजपवर कठोर टीका करतात म्हणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची ईडीची कारवाई अन्यायकारक असल्याचे पवार म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीचे अलिबागमधील भूखंड व दादरमधील सदनिका ईडीने जप्त केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aimim imtiaz jaleel ncp sharad pawar shivsena sanjay raut nawab malik sgy