Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता कारवाईला वेग आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या प्रकरणात लक्ष घालत आहेत. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप होत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर पहिल्यांदाच आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना धीर दिला. दरम्यान मध्यरात्री वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.
अजित पवार फोनवर म्हणाले की, जी घटना घडली ती वाईट आहे. आपल्या मुलीचा प्रेमविवाह झाला होता. तुम्ही त्याचवेळी जर मला माहिती दिली असती, तर आपण वेळीच या प्रकरणात लक्ष घातलं असतं. दुसरी गोष्ट, माझा या गोष्टीशी दुरान्वये संबंध नाही. वैष्णवीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मलाही दुःख झाले. पोलिसांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत.
वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबाच्या ताब्यात द्या, असेही निर्देश दिल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच हगवणे कुटुंबातील काहींना अटक केली आहे. सासरा फरार असून त्याचाही शोध घेतला जात आहे. तीन पथके त्याचा तपास करत होते, मात्र मी आणखी पथके त्याच्या मागावर पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याला आम्ही सोडणार नाही, असे अजित पवार यांनी वैष्णवीचे वडील अनिल यांना सांगितले.
“आपल्या सोन्या सारख्या मुलीला त्यांनी संपवलं. त्यांना मुलीला नांदवायची नव्हती तर घरी पाठवायचं होतं”, असेही अजित पवार म्हणाले. तसेच मी मुलींच्या आणि महिलांच्या बाजूचा आहे. मी तुमच्या पाठिशी असून लवकरच तुमची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी अनिल कस्पटे यांनी पुन्हा एकदा लग्नातील गाडी देतानाचा प्रसंग अजित पवारांना सांगितला. तुम्ही गाडीबद्दल लग्नात खोचक प्रश्न विचारला होता. आम्ही प्रेमापोटी मुलीला सर्व गोष्टी दिल्या होत्या, असे अनिल कस्पटे म्हणाले.
केवळ लग्नाला गेलो म्हणून माझ्या मागे लचांड – अजित पवार
दरम्यान वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या लग्नाला उपस्थित राहिल्याबद्दल अजित पवारांना लक्ष्य केले जात होते. यावरही अजित पवार यांनी आपली भूमिका एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. माझा त्यांच्याशी दुरान्वये संबंध नाही. मी फक्त त्या लग्नाला हजर होतो, एवढाच माझा त्यांच्याशी संबंध. लग्नाला गेल्यामुळे उगाच माझ्यामागे असं लचांड लागतं. मी सर्वांना बजावून सांगतो, उद्या मी कोणाच्या लग्नाला आलो नाही तर मला माफ करायचं, नाहीतर असं लचांड लागतं.

अजित पवारांचे मुलींना आवाहन
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आज माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “माझे मुलींना आवाहन आहे की वधू म्हणून कोणत्याही कुटुंबात जाता तेव्हा जरा तरी संशय आला तर त्यांनी तक्रार करावी. यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. इतकी मोठी वेळ कोणावरही येणार नाही.”