scorecardresearch

Premium

“राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशाने झालं”, अजित पवारांचा खळबळजनक आरोप!

अजित पवार म्हणतात, “१ मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही…!”

ajit pawar sharad pawar (3)
अजित पवारांचे शरद पवारांवर गंभीर आरोप (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून आता जवळपास चार महिने उलटले. सध्या निवडणूक आयोगासमोर पक्ष व पक्षचिन्ह कुणाचं? यासंदर्भात सुनावणीही चालू आहे. मात्र, यादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात केलेल्या भाषणात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केलं आहे. यामध्ये अजित पवारांनी थेट शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवारांचा राजीनामा आणि त्यानंतरत्या घडामोडींवर त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली.

शरद पवारांच्या राजीनाम्यावेळी नेमकं काय घडलं?

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राजीनामा मागे घेण्यासंदर्भात छगन भुजबळांपासून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांना विनंती केली. यानंतर दोन दिवसांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. यासंदर्भात अजित पवारांनी शिबिरात बोलताना सविस्तर भाष्य केलं.

Sharad Pawar group protest
शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ शरद पवार गटाचे धरणे आंदोलन
rohit pawar ajit pawar
“उद्या म्हणतील, यांना ऑक्सिजनही देऊ नका”, अजित पवार गटाच्या न्यायालयातील युक्तीवादावरून रोहित पवारांचा टोला
bihar trust vote
बिहारमध्ये १२ फेब्रुवारीला विश्वासदर्शक ठरावावर मतदान; विधानसभा अध्यक्षांचा मात्र अद्यापही राजीनामा नाही, नितीश कुमारांपुढे नवं आव्हान उभं राहणार?
Sanjay ruat on chhagan bhujbal
छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रातलं हे राजकारण…”

काय म्हणाले अजित पवार?

“आम्हाला सातत्यानं गाफील ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही १० ते १२ जण देवगिरीवर बैठकीसाठी बसलो होतो. सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगितलं तर त्यांना काय वाटेल? असा विचार होता. म्हणून आम्ही सुप्रियाला तिथे बोलवून घेतलं. तिला काहीच सांगितलं नाही की आम्ही सगळे तिथे आहोत. तिला सांगितलं की सगळे जीवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो, तर संघटना पुढे जाते. सगळं ऐकल्यानंतर तिनं सांगितलं की मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते. आम्ही १० दिवस थांबलो. तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते”, असा दावा अजित पवारांनी आपल्या भाषणात केला.

छगन भुजबळांचं शरद पवारांवर शरसंधान; म्हणाले, “एवढी चिडचिड…!”

“शरद पवारांना सगळं सांगितलं होतं”

दरम्यान, सुप्रिया सुळेंना दिलेली मुदत उलटल्यानंतर थेट शरद पवारांना सगळं सांगितल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. “त्यानंतर आम्ही थेट शरद पवारांकडे गेलो. त्यांनी सगळं ऐकलं. ते म्हणाले ठीक आहे. बघू आपण काय करायचं ते. नंतर आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला चर्चा केली. मी म्हटलं की वेळ जातोय. लवकर काय तो निर्णय घ्या”, असं अजित पवार म्हणाले.

“१ मेलाच राजीनामा द्यायचं ठरलं होतं”

दरम्यान, पुस्तक प्रकाशन समारंभाच्या एक दिवस आधीच राजीनामा देण्याचा निर्णय झाला होता, असं अजित पवार म्हणाले. “१ मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. १५ लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली”, असं अजित पवारांनी नमूद केलं.

“आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला व युवक पाहिजे. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही की का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. ठराविकच टाळकी होती तिथे. जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता तिथे. आम्हालाही कळेना. मला एक सांगतायत, तिथे एक सांगतायत”, असा खळबळजनक दावा अजित पवारांनी यावेळी केला.

“…म्हणून मला टार्गेट करण्यात आलं”, अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “माझ्यावरच्या आरोपांमुळे…!”

“त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला गेला. आम्हाला सांगितलं की सुप्रियाला माझ्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणं बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा. एक घाव दोन तुकडे, विषय संपला”, असंही अजित पवार म्हणाले.

“१५ जुलैला आम्हाला सगळ्यांना कशाला बोलवलं?”

दरम्यान, १५ जुलै रोजी अजित पवार गटातील सर्व मंत्री व आमदारांना कशासाठी शरद पवारांनी बोलवलं होतं? असा सवालही अजित पवारांनी केला. “आम्ही २ जुलैला घेतलेला निर्णय आवडला नव्हता, तर १५ दिवसांनी १७ जुलैला आम्हा सगळ्या मंत्र्यांना त्यांनी चव्हाण प्रतिष्ठानला कशाला बोलवलं? आम्हाला सांगितलं की आधी मंत्री या. दुसऱ्या दिवशी आमदार या. काही आमदार घाबरत होते. मी आमदारांना घेऊन गेलो. सगळे बसले. चहापाणी झालं. तिसऱ्या दिवशी शरद पवारांबरोबर राहिलेल्या लोकांबरोबर चर्चा होणार होती. पुन्हा सगळं सुरळीत होणार होतं हे आम्हाला सांगितलं गेलं. गाडी ट्रॅकवर आहे असं आम्हाला काही जणांकडून सांगितलं जायचं. यात वेळ गेला. तटकरे म्हणायचे आम्हाला लवकर सांगा, आम्हाला पुढे जायचंय. रुपाली चाकणकरांनी काही बोललं की सांगायचे की तू तसं काही म्हणू नको असं सांगितलं जायचं. सगळं पूर्ववत करण्याबाबतचे निरोप यायचे. तुम्ही आम्हाला गाफील ठेवायचे का?” असा सवाल अजित पवारांनी थेट शरद पवारांना केला आहे.

१२ ऑगस्टची ‘ती’ भेट

१२ ऑगस्ट रोजी शरद पवार व अजित पवारांची एका उद्योगपतींच्या घरी भेट झाल्याची जोरदार चर्चा झाली. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. “१२ ऑगस्टला मला एका उद्योगपतीकडे बोलवलं. त्यांनी मला सांगितलं की इथे वरीष्ठ(शरद पवार), जयंत पाटील, तुम्ही आणि मी एकत्र जेवायचं. निरोप आल्यानंतर मी गेलो. आमच्या निर्णयानंतर जवळपास दीड महिना उलटला होता. जर करायचंच नव्हतं तर कशासाठी हे सगळं केलं. कुणासाठी करता? आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच करतो ना? आम्ही चांगलं सरकार चालवू शकत नाही का? मागे अडीच वर्षांत कोण काय करत होतं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे”, असं अजित पवार म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajit pawar claims sharad pawar resign drama ncp split story pmw

First published on: 01-12-2023 at 13:59 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×