Ambadas Danve Criticism On Ajit Pawar: पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जमीन खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याच्या आरोपांची राळ उठल्यानंतर पार्थ पवार भागीदार असलेल्या कंपनीचा जमीन व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.
ही घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, “जमिनीचा प्राथमिक करार करण्यात आला होता. यात एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही. विक्रेत्यास कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत.” आता विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्या या स्पष्टीकरणावर टीका करत, “संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केल आहे.
भ्रष्टाचाराला दिलेला राजश्रय…
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते अंबादास दानवे म्हणाले की, “अजित पवार म्हणतात की, व्यवहार झालाच नाही. असे असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली? अजित पवार यांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’ आहे. इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बेसंबंध वाक्ये सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल.”
पार्थ पवार प्रकरणावर अजित पवारांचे स्पष्टीकरण
पार्थ पवार यांच्या कंपनीचा व्यवहार रद्द करत असल्याची घोषणा करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, “सार्वजनिक जीवनात वावरताना मी काहीही चुकीचे केले नाही. यापूर्वी माझ्यावर असेच आरोप झाले. पण आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. या व्यवहाराची मला काहीही माहिती नव्हती. सार्वजनिक जीवनात वावरताना आरोपांचा संशय आपल्यावर होऊ नये या उद्देशाने पार्थ यांच्या कंपनीने केलेला करार रद्द करण्यात येत आहे. विक्रीपत्र रद्द करण्यासाठी शुक्रवारीच आवश्यक दस्तऐवज नोंदणी कार्यालयात सादर करण्यात आले आहेत.”
अजित पवार यांनी पुढे सांगितले की, “जमिनीचा प्राथमिक करार करण्यात आला होता. यात एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही. विक्रेत्यास कोणतेही पैसे देण्यात आलेले नाहीत. जमिनीचा ताबाही घेतलेला नाही. हा व्यवहार अपूर्ण अवस्थेत आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.”
