इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची काल (२२ मे) तब्बल साडेनऊ तास ईडी चौकशी झाली. ईडीने समन्स बजावल्यापासून चौकशी होईपर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. परंतु, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी याप्रकरणी भाष्य करणं टाळलं होतं. अखेर याप्रकरणावरील मौन अजित पवारांनी सोडलं असून जयंत पाटलांच्या चौकशीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटलांच्या ईडी चौकशीनंतर अजित पवारांनी फोन केला नसल्याची माहिती जयंत पाटलांनी स्वतः दिली. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना विचारले. त्यावर ते म्हणाले की, “वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्यस्तरावरील यंत्रणा असतात. वेगवगेळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार या यंत्रणांना असतो. या यंत्रणांनी चौकशीला बोलावल्यानंतर नेतेमंडळी पूर्णपणे सहकार्य करतात. जयंतराव पाटलांना साडेनऊला सोडल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट आपण पाहिलंय. आता याबद्दल दबक्या आवाजात भूमिका घेतात.”

हेही वाचा >> “ईडी चौकशीनंतर मला अजित पवारांचा फोन आला नाही”, जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; नाराजीच्या चर्चांना उधाण!

“मुंबईच्या अधिवेशनात वरच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काय सांगितलं हे रेकॉर्डमध्ये आलंय. काँग्रेसमध्ये अनेक वर्ष मंत्रिपद उपभोगलेले मंत्री भाजपामध्ये गेल्यावर एका कार्यक्रमात त्यांनी जाहीर केलं होतं की इकडे आलोय, काही त्रास नाही, व्यवस्थित झोप येते आम्ही बिंधास्त आहोत. तीच गोष्ट सांगली जिल्ह्यात खासदारांनी सांगितली. केंद्रीय राज्यमंत्र्यांनीही स्टेटमेंट केलंय आम्ही स्वच्छ करतो, निरमामध्ये घालतो वगैरे. वास्तविक एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून अशी स्टेटमेंट येतात. चौकशीला बोलावल्यानंतर काही घाबरण्याचं कारण नाही. काहींनी पूर्वीची उदाहरणे दिली की युपीए सरकार असताना मोदी आणि शाहा यांनाही कसं बोलावलं होतं वगैरे. परंतु, द्वेष भावनेतून, राजकीय सुडबुद्धीने कोणाला बोलावण्यात येऊ नये. काही क्लू मिळाला, तर नोटीस काढण्याचा त्यांचा अधिकार आहे. अशा यंत्रणांच्या चौकशीसाठी कोणी गेल्यास त्यावर कोणतेही वक्तव्य माझ्याकडून करण्यात आलेले नाही. यापूर्वीही अनेक नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले मात्र या गोष्टीतून काही लोक जाणीवपूर्वक वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मात्र असा चौकशींवर मी कोणतेही वक्तव्य करत नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवारांनी माध्यमांसमोर मांडली.

चर्चेला उधाण का?

जयंत पाटलांची ईडी चौकशी हा राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. त्यांच्या चौकशीबाबत राज्यातील वरीष्ठ नेते मौन असल्याचंही बोललं जात असताना जयंत पाटील यांनी मात्र सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाचं एकाचं नाव राहिलं, तर चूक होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांचे फोन आले असं मी सांगितलं. आमच्या वेगवेगळ्या पक्षातील सर्वच मित्रांचे फोन आले. आज सकाळीही फोन आले”, असं जयंत पाटील म्हणाले.

एकीकडे जयंत पाटील यांनी “कुणा एका नेत्याचं नाव घेतलं नाही तर चूक होईल, म्हणून सगळ्यांनी फोन केले असं मी सांगतोय” असं म्हणाले. पण दुसरीकडे त्यांनी अजित पवारांचा मात्र स्वतंत्र उल्लेख केला. माध्यमांनी अजित पवारांचा फोन आला होता का? असा प्रश्न केला असता “त्यांचा फोन आलेला नाही”, असं जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यामुळे या दोघांमधल्या नाराजीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar finally speaks on jayant patils ed probe says after calling for an inquiry sgk
First published on: 23-05-2023 at 11:50 IST