राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात जाऊन जोरदार टोलेबाजी केलीय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करताना अजित पवार यांनी मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं. संस्था उभ्या करायला अक्कल लागते, मात्र, संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही असं म्हणत त्यांनी राणेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते रत्नागिरीत प्रचारसभेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार म्हणाले, “सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा. कुणाच्याही दबावाला, दादागिरीला, दहशतीला बळी पडण्याचं अजिबात कारण नाही. इथं कशाप्रकारे काही घटना घडल्या याचा इतिहास तुम्हा सर्वांच्या समोर आहे. म्हणून मतदारांनी गाफील राहू नका अशी विनंती आहे.”

“काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा. कुणाच्याही दबावाला, दहशतीला बळी पडू नका. विचारपूर्वक मतदान करा,” असं आवाहन अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या मतदारांना केलं आहे.

“खासदार आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेवर निवडून येणं अवघड”

अजित पवार म्हणाले, “खासदार आमदार होणं सोपं, पण जिल्हा बँकेवर निवडून येणं अवघड आहे. कारण पार्टी तिथं कार्यकर्ता याप्रमाणे पक्षाचा कार्यकर्ता तिथं मजबुतीने काम करत असेल तर आमदारकी-खासदारकीत जमून जातं. इथं मात्र, वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढली, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तर कृपा करून त्याला बळी पडू नका. आज आपल्या राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर याच बँका चांगल्या आहेत.”

हेही वाचा : अजित पवार यांनी बालेकिल्ल्यात ‘अक्कल’ काढली, नारायण राणेंकडून घणाघाती प्रत्युत्तर, म्हणाले…

“एकावेळी राज्यात सर्वाधिक पीक कर्ज देणारी बँक नाशिक जिल्हा बँक होती. आज ही बँक अडचणीत आली आहे. सोलापूरची बँकही दिग्गज नेते असून अडचणीत आली. उस्मानाबाद जिल्हा बँकही अडचणीत आली. वर्धा, नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकाही अडचणीत आल्या आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, धुळे-नंदूरबार, वाशिम-अकोला, जळगाव, जालनाच्या बँका चांगलं काम करत आहेत,” असंही अजित यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar indirectly criticize narayan rane in ratnagiri over establishing institutions pbs
First published on: 26-12-2021 at 17:31 IST