नांदेड : उमरी तालुक्यातील ‘गोरठेकर गट’ आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षामध्ये प्रवेश करणार असून, तेथे या पक्षात आधीपासून कार्यरत असलेल्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना न जुमानता गोरठेकरांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पाडला जात आहे. त्यातून या पक्षातील बेबनाव पुढे आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ‘राष्ट्रवादी’ चे अध्यक्ष अजित पवार तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व अन्य नेते शनिवारी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत उमरी आणि देगलूर येथे पक्षातर्फे कार्यक्रमांत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
पक्षाध्यक्षांच्या नांदेड दौऱ्याची, पक्ष प्रवेश सोहळ्याची आखणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काही दिवसांपूर्वी केली. गोरठेकर गटाला आपल्या पक्षात आणण्याचे चिखलीकर यांनी परस्पर ठरविल्यामुळे तेथे आधीपासून कार्यरत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजच्या (शनिवार) कार्यक्रमापासून दूर झाले आहेत.
उमरीतील डॉ. विक्रम देशमुख तळेगावकर हे ‘राष्ट्रवादी’चे प्रदेश सरचिटणीस असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून गोरठेकर गटाला पक्षात घेण्याचा घाट घातला गेला आहे.
स्थानिक आमदार भाजपचे असून डॉ. विक्रम देशमुख यांच्या गटाशी त्यांचा चांगला समन्वय आहे; पण आता ‘राष्ट्रवादी’ त नव्या गटाची घुसखोरी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यातील समन्वय बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमरी नगर परिषद निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील, असे दिसत आहे.
गोरठेकर गट सत्तेतल्या एका पक्षात प्रवेश करत असतााना, या गटाचे हित ज्या उमरी जीनिंग-प्रेसिंग संस्थेच्या जमीन विक्रीमध्ये गुंतले आहे, त्या प्रकरणाची चर्चा सुरू झाली असून, आमदारांनी जमीन विक्रीचे मनसुबे उधळून लावावेत, अशी मागणी एका गटाकडून पुढे आली आहे.
एक गट संतप्त, नाराज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. ज्या मंडळींकडून उमरीमध्ये पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन केले जात आहे, त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आधीपासून काम करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षापासून दूर लोटण्याचा डाव टाकला आहे, अशी संतप्त भावना या बैठकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सतत पक्षबदल करणाऱ्यांना सन्मान दिला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. उद्या (शनिवारी) होणाऱ्या कार्यक्रमात हे पदाधिकारी सहभागी होणार नाहीत, असे सांगण्यात आले.
