गेल्या १५ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू आहे. राज्य सरकारने इतर कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी मागितलेला महिन्याभराचा अवधी त्यांनी दिला असला, तरी स्वत: मुख्यमंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र, हे सर्व प्रकरण ज्या लाठीचार्जपासून अधिक तापू लागलं, त्या जालन्यातील लाठीचार्जसंदर्भात आता अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
नेमकं काय घडलं होतं जालन्यात?
जालन्याच्या अंतरवली गावात मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसले आहेत. १ सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्यानंतर त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी ही विनंती मान्य केली नाही. त्यापाठोपाठ तिथे मंडपात जमा झालेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. यामध्ये काही पोलीसही जखमी झाले. या प्रकरणात काही आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
लाठीचार्जवरून विरोधकांचा हल्लाबोल
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवर आंदोलकांसह विरोधी पक्षांनी परखड शब्दांत टीका केली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी याला जालियनवाला बाग घटनेची उपमा देत लाठीचार्जचे आदेश देणाऱ्यांना जनरल डायरची उपमा दिली. आंदोलकांकडून लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणी करण्यात आली. आज राज्य सरकारकडून ही मागणी मान्य करण्यात आली आहे.
अजित पवार म्हणतात, “फडणवीसांचा संबंध नाही”
दरम्यान, या लाठीचार्जसंदर्भात राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीने जाहीर माफी मागितली. त्यावर आज शासन आपल्या दारी कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.
जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, नेमकं काय घडलं? काय आहे हे प्रकरण?
“या संपूर्ण मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मराठा आरक्षण देताना मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीय अर्थात भटके विमुक्त किंवा ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. कुणीही लाठीचार्जचं समर्थन करणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.
आरक्षणासाठी राज्य सरकारला एक महिना देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केली भूमिका
“टोलवाटोलवी करून चालत नाही”
“स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासाठी माफी मागितली. वास्तविक त्यांचा काही संबंध नव्हता. तिथल्या अधिकाऱ्यांची चूक होती. पण एकमेकांवर टोलवाटोलवी करून चालत नाही. शेवटी समाज आपला आहे, लोक आपले आहेत, राज्य आपलं आहे हीच आपली भावना आहे”, असंही अजित पवार म्हणाले.