Ajit Pawar : छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथीच्या निमित्ताने आज (१२ एप्रिल) रायगडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात अनेकांनी भाषण केलं. मात्र, अजित पवारांनी भाषण केलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली. पण अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही. त्यामुळे अजित पवारांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रायगडावर नेमकं काय घडलं? भाषण का केलं नाही? याचं कारण स्वत: अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. ‘वेळ कमी होता. त्यामुळे वेळेअभावी मी रायगडावर भाषण केलं नाही’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच रायगडावर कोणाकोणाची भाषणे झाली? हे देखील सांगितलं.

अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली?

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे कसं गेलं पाहिजे? या संदर्भाने रायगडावर चर्चा झाली. तसेच रायगडावर सर्वांनी भाषणं केले. पण वेळ कमी होता, त्यामुळे मी काही भाषण केलं नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केले”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

फडणवीसांच्या जागी शिंदेंचं भाषण, रायगडावर काय घडलं?

छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सर्वप्रथम खासदार उदयनराजे भोसले यांनी भाषण केलं. त्यानंतर सूत्रसंचालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, फडणवीस यांनी सूत्रसंचालकांना थांबवलं आणि सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषण करतील. त्यानंतर सूत्रसंचालकांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. एकनाथ शिंदे यांनी या भाषणावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक करत जोरदार भाषण केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं आणि शेवटी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण झालं. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे अजित पवारांना डावलल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चांनंतर आता अजित पवार यांनी आपल्याला डावलंलं नसल्याचं सांगत वेळेअभावी आपण भाषण केलं नसल्याची स्पष्टीकरण दिलं.