राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यपालांच्या विधानाचा निषेध करत त्यांनी राज्यपाल पदावर राहावं का? याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यपालांना सद्बुद्धी लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत असल्याचेही ते म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तीन वर्षांहून अधिक काळ राज्यपालपदी राहल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर त्यांनी राज्यपाल पदावर राहावं का? याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान मोदी यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे”. तसेच “राज्यपालांना सद्बुद्धी लाभो”, अशी प्रार्थना करत असल्याचेही ते म्हणाले.
“महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे, तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील”, असेही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते राज्यपाल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले होते. “तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत” असे ते म्हणाले.