Ajit Pawar on Jayant Patil Resignation: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा काल राजकीय वर्तुळात सुरू होती. जितेंद्र आव्हाड यांनी ही चर्चा खोडून काढली असली तरी यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. खुद्द शशिकांत शिंदे यांनी वाहिन्यांना प्रतिक्रिया देताना ते या पदासाठी शर्यतीत असल्याचे सांगितले. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि कधी काळी जयंत पाटील यांचे सहकारी राहिलेल्या अजित पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आज पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आणि समस्यांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांना जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबद्दल विचारण्यात आले. यावर ते म्हणाले, “त्यांच्या पक्षाअंतर्गत त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे.”
जयंत पाटील आणि माझी राजकीय भूमिका…
जयंत पाटील तुमच्याबरोबर येणार आहेत का? असाही प्रश्न यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “जयंत पाटील वरिष्ठ नेते आहेत. आम्ही दोघांनी अनेक वर्ष एकत्र काम केले आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आर. आर. पाटील असे आम्ही सर्व नव्वदच्या बॅचचे आहोत. आमची आता आमदारकीची आठवी टर्म आहे. इतके वर्ष एकत्र काम केल्यामुळे आमचे संबंध आहेत. पण त्यांची आणि माझी राजकीय भूमिका वेगळी आहे, हे जगजाहीर आहे.”
पुढ्या आठवड्यात त्यांना विचारेन..
अजित पवार पुढे म्हणाले, त्यांनी कोणत्या हेतून राजीनामा दिला, हे आपल्याला माहीत नाही आणि विचारण्याचाही अधिकार नाही. ते पुढच्या आठवड्यात अधिवेशनात भेटले तर सहज त्यांना याबद्दल त्यांना विचारेन. ते सहा ते सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे इतरांना संधी देऊन त्यांना कदाचित राष्ट्रीय पातळीवर जायचे असेल.
जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही शनिवारी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तो त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा आणि जे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहेत त्यांनाही शुभेच्छा. सर्वांनी चांगले काम करावे यासाठी शुभेच्छा.”
दरम्यान जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याचे वृत्त पसरताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी भुवया उंचावणारे विधान केले. ते म्हणाले, जयंत पाटील हे अनेक वर्षांपासून पक्षात अस्वस्थ आहेत, असे बोलले जात होते. आज त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षात प्रवेश केला तर आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांचे स्वागतच करतील.