विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्याच दिवशी भारतीय जनता पार्टी व अजित पवार गट या दोन सत्ताधाऱ्यांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं. विशेष म्हणजे सभागृहात हे काहीही न घडता सभागृहाबाहेर हे सगळं घडून आलं. सकाळी सभागृहात एकत्र बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी संध्याकाळी अजित पवारांना पत्र पाठवून नवाब मलिकांबाबत नाराजी व्यक्त केली आणि हे पत्र त्यांनी ट्विटरवरही पोस्ट केलं. त्यामुळे यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं असताना आता त्यावर अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नवाब मलिकांच्या समावेशावरून मतभेद!

देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांना अजित पवार गटात सहभागी करून घेण्यावरून आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी रीतसर पत्र लिहून नवाब मलिकांच्या सरकारमधील समावेशाला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, “आमच्या भावनांचा आपण विचार कराल”, अशा सूचक शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पत्राचा शेवट केला आहे. त्यामुळे यावरून तर्कवितर्कांना उधाण आलेलं असताना अजित पवारांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना नवाब मलिकांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचं सांगितलं आहे.

वाचा देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेलं पत्र…

devendra fadnavis letter
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र!

“आधी नवाब मलिकांची स्पष्ट भूमिका येऊ द्या”

“नवाब मलिक कालच सभागृहात आले होते. ते कुठे बसले हे टीव्हीवाल्यांनीच दाखवलं आहे. यात स्वत: नवाब मलिकांची भूमिका अद्याप आलेली नाही. आम्ही महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदाच ते सभागृहात आले. त्यांची भूमिका काय आहे हे पाहावं लागेल”, असं अजित पवार म्हणाले.

विशेष अग्रलेख – नवाब मलिक नकोत; पुढे?

“प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांची भूमिका ऐकल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांचं पत्र मला मिळालं. मी ते वाचलं आहे”, असंही ते म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांकडे अजित पवारांचा फोन नंबर…”, जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “भाजपाची अडचण झालीये!”

“कुणी कुठे बसावं हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. इतर कोण काय म्हणालं हे मला माहिती नाही. नवाब मलिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर मी माझी भूमिका मांडणार. त्या पत्राचं काय करायचं ते माझं मी बघेन. त्याबद्दल मीडियाला काही सांगण्याचं कारण नाही”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयंत पाटलांची खोचक टीका

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावरून जयंत पाटलांनी खोचक टीका केली आहे. हे पत्र म्हणजे फडणवीसांचा बाजू स्वच्छ करण्याचा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील म्हणाले आहेत. “उपमुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा फोन नंबर आहे असं दिसत नाहीये. असे प्रश्न फोनवर सांगायला हवेत. त्यासाठी पत्र लिहायला लागणं हे आश्चर्य आहे. जी माहिती माझ्यामते ते फोन उचलून अजित पवारांना देऊ शकले असते. पण त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करायला प्राधान्य दिलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. “हे पत्र एका उपमुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी आहे की आपली बाजू स्वच्छ करण्यासाठी, आम्ही त्यातले नाहीत हे सांगण्यासाठी आहे हा अभ्यास करण्याचा विषय आहे. भाजपाची अडचण झाली आहे असं दिसतंय”, असा टोलाही त्यांनी लगावला.