सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करत आहेत. साधारण महिना उलटलेला असला तरी अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. असे असताना हे सरकार अल्पजीवी असून कधीही कोसळू शकते, असा दावा शिवसेना आणि काँग्रेसकडून केला जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, त्यासाठीचा मुहूर्तही सांगू असे वक्तव्य केले आहे. याच वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी मुहूर्तावर विश्वास ठेवणार माणूस नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा >> महाराष्ट्र अतिवृष्टी : उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या कशा समजणार? अजित पवारांचा राज्य सरकारला टोला

“मी मुहूर्तावर विश्वास ठेवणारा माणूस नाही. मी घेतलेली शपथ गांभीर्यपूर्वक पूर्ण करतो, हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सुरुवातीला खासदार झालो होतो. आमदार झालो. राज्यमंत्री झालो होतो. चार वेळा उपमुख्यमंत्री झालो. पण प्रत्येक वेळी मी शपथ गांभीर्यपूर्वक घेतली. घेतलेली शपथ मी पूर्णदेखील करतो. मला मुहूर्त वगैरे माहिती नाही,” असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांचे ‘ते’ ट्वीट म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी”; अमोल मिटकरींची टीका

पुन्हा एकदा सत्तांतर होईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीदेखील आमदार आमच्या संपर्कात आहेत म्हणत सत्ताबदल होईल असे वक्तव्य केले होते. “सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावा संजय राऊत यांनी केला होता. भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही असंही ते म्हणाले होते.