Ajit Pawar Remark on Manoj Jarange Maratha Reservation Demands : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक समुदायातील लोकांच्या मतांमुळे निकालात मोठा फरक पडला, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. यावरून त्यांना महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन प्रामुख्याने मराठवाड्यात तापलं होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला असं बोललं जातं. मराठवाड्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक उमेदवार उभा केला होता जो जिंकू शकला नाही. यावरून अजित पवार यांना मराठा आरक्षणाविषयीची त्यांची रोखठोक भूमिका विचारण्यात आली. तुमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे की विरोध आहे? असं विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं ही माझी देखील भूमिका आहे.

अजित पवार यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. मराठा समाजात गरीब कुटुंबांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांनाही इतरांच्या बरोबरीला येण्यासाठी शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळायला पाहिजे”. अजित पवारांच्या या उत्तरानंतर त्यांना विचारण्यात आलं की मराठा समाजाला नेमकं आरक्षण मिळणार कसं? मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं, दुसऱ्या बाजूला ओबीसींचा त्यास विरोध आहे याबाबत तुमची भूमिका काय? यावर अजित पवार म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीत यावर चर्चा करायला हवी.”

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अजित पवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची, घटक पक्षांची बैठक बोलवावी. या बैठकीत सविस्तर चर्चा करावी, असं मला वाटतं महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंत अशा प्रकारचे अनेक प्रसंग निर्माण झाले आहेत. मात्र विरोधाला विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्राने कधी घेतली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनी समंजस भूमिका घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इतर राज्यांचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही तोच आहे.

हे ही वाचा >> Rohit Pawar : “कुटुंब फोडलं, पक्ष फोडले, हेच देवेंद्र फडणवीसांचं कतृत्व का?” रोहित पवारांची सडकून टीका; अजित पवारांनाही केलं लक्ष्य, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. दुर्दैवाने काही पक्ष व काही पक्षांचे नेते त्या बैठकीला येऊ शकले नव्हते. आता लोकसभेचे अधिवेशन संपत आहे त्यामुळे विविध पक्षांचे खासदार व प्रमुख नेते या अधिवेशनातून मोकळे होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ही बैठक आयोजित केली पाहिजे. या बैठकीत सर्व पक्षांचं नेत्यांचं मत जाणून घेऊन मराठा समाजावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन निर्णय घेतला पाहिजे.