Ajit Pawar Baramati Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवल्याचं पाहायला मिळालं. महायुती व महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धडाका लावल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रातील काही चर्चेतल्या मतदारसंघांमध्ये बारामतीचा समावेश आहे. पवार कुटुंबातील काका-पुतण्या एकमेकांसमोर या निवडणुकीच्या निमित्ताने उभे ठाकले आहेत. एकीकडे अजित पवार तर दुसरीकडे शरद पवारांच्या पाठिंब्यावर युगेंद्र पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवारांनी आपल्या सांगता सभेतून यावर भाष्य करताना आपलं कुटुंब यावेळी आपल्यासोबत असल्याचं विधान केलं.

लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी पत्नी सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली होती. समोरच्या बाजूला अजित पवारांच्या भगिनी सुप्रिया सुळे उभ्या होत्या. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारसभांमध्ये सुप्रिया सुळेंना पवार कुटुंबातील अनेक सदस्यांचा पाठिंबा असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचा संदर्भ देत अजित पवारांनी आजच्या सांगता सभेमधून सूचक भाष्य केलं. या सभेवेळी अजित पवारांच्या आईदेखील उपस्थित होत्या. त्याचा उल्लेख अजित पवारांनी यावेळी केला.

काय म्हणाले अजित पवार?

“या सगळ्या प्रचारात मला अनेक गोष्टी आमच्या कार्यकर्त्यांनी, निरीक्षकांनी सांगितल्या. मी मागे थोडा एकटा पडलो होतो. पण यावेळी माझी आई माझ्याबरोबर आहे. माझ्या बहिणी माझ्याबरोबर आहेत. त्या फिरत आहेत. जय आणि पार्थनं त्यांच्या बापासाठी फिरलं पाहिजे ना. बायकोनंही फिरलं पाहिजे. ती पराभूत झाली तरी तिला राज्यसभा दिली. ती खासदार आहे. तिथेही त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसनं ठेवला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सडेतोड उत्तर द्या”

दरम्यान, समोरच्या बाजूने भावनिक साद घातली गेल्यास सडेतोड उत्तर देण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं. “मला एक चिठ्ठी आली की दादा अजूनही काहींना भावनिक करण्याचा प्रयत्न होतोय. सडेतोड उत्तर द्यायला शिका. घाबरण्याचं काम नाही. तुमच्याकडून चूक नसताना कुणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या पाठिशी आहे.काहीजण म्हणतात की आम्ही तर दोन्ही पवारांकडेच आहोत. मग दोन मतं तिकडे आणि दोन इकडे. मला तसं नकोय. चारही मतं मलाच पाहिजेत. काम वाजवून घ्या, खणखणीत. आणि मतंही तशाच पद्धतीनं द्या. अशी दोन-दोनची भानगड करू नका. छोटं कुटुंब, सुखी कुटुंब इथे नकोय आपल्याला. बारामतीचा मोठा परिवार आपल्याला वाढवायचा आहे”, असं आवाहन अजित पवारांनी केलं.