नांदेड : गेल्या बुधवारच्या जागतिक पुस्तक दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘ग्रंथप्रेम’ समोर आले असून, नांदेड विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन गेलेल्या पक्ष कार्यकर्त्यांना दटावत पुस्तक देण्याचा सल्ला त्यांनी दिला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मात्र पुस्तक देऊन उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमांना जाण्यासाठी पवार शनिवारी सकाळी विशेष विमानाने नांदेडला आले. विमानतळावर प्रमुख अधिकारी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार विक्रम काळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. विमानातून उतरल्यानंतर जिल्हाधिकारी कर्डिले यांनी उपमुख्यमंत्र्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ’ भेट देऊन त्यांचे स्वागत केले; पण आजी-माजी आमदारांसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणल्याचे पाहून पवार यांनी साऱ्यांनाच फटकारले. यापुढे हे पुष्पगुच्छ आणणे बंद करा, त्याऐवजी पुस्तक देऊन स्वागत करण्याचा सल्ला त्यांनी सर्वांनाच दिला. तर आमदार चिखलीकर व काळे यांचा पुष्पगुच्छ पवारांनी स्वीकारल्याचे दिसले.

अजित पवार यांचे काका ज्येष्ठ नेते शरद पवार हे ग्रंथप्रेमी राजकारणी म्हणून ओळखले जातात. आपल्या विविध संस्थांमार्फत महत्त्वाची पुस्तके खरेदी करून त्यांनी ती वाचनालये आणि महाविद्यालयांना भेट दिल्याचे अनेकांना ठाऊक आहे; पण अजित पवार यांनाही आता पुस्तकांचे महत्त्व उमजल्याचे शनिवारी येथे बघायला मिळाले. पवार यांच्या आगमनप्रसंगी पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप धर्माधिकारी, बाळासाहेब रावणगावकर, प्रवीण पाटील चिखलीकर, शिवराज पाटील होटाळकर, वसंत सुगावे आदी हजर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नांदेड विमानतळाबाबत चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड विमानतळ रिलायन्स समूहाकडून काढून घेतल्यानंतर शासन स्तरावर चाललेल्या घडामोडींची माहिती लोकप्रतिनिधी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना दिली. हे विमानतळ सध्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित असले, तरी लवकरच त्याचा ताबा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे दिला जाणार असून, विमानतळ विकास आणि व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.