अकोले: तालुक्यात २५ गावांत राजरोस दारूविक्री सुरू आहे. संगमनेर, शेंडी, ठाणगाववरून दारूची वाहतूक उघडपणे होते. वीरगाव फाटा, इंदोरी फाट्यावरून दारू पाठवली जाते. त्याचत्याच तक्रारी करण्यापेक्षा आता राजूर व अकोले येथील पोलीस अधिकारी व राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना याचा लेखी जाब विचारून वरिष्ठांकडे तक्रारी कराव्यात, अशी मागणी अकोले तालुका दारूबंदी समितीच्या बैठकीत समितीचे अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी केली. अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तालुका दारूबंदी समितीच्या बैठकीत उत्पादन शुल्क व पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध त्यांनी थेट लेखी तक्रारही केली आहे. तालुक्यातील ज्या गावात दारू विकली जाते, त्या गावांची यादीच हेरंब कुलकर्णी यांनी तहसीलदारांसमोर ठेवली व या बिटच्या अंमलदारांवर कारवाईची मागणी केली. संगमनेर येथून रोज रात्री दारूच्या गाड्या येताना उत्पादनशुल्क विभाग त्या रोखत का नाही? ते यात सामील आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा पकडल्यावर गुटखा विकणाऱ्या दुकानदारांकडून पैसे गोळा केल्याच्या आरोपाची चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली.
यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी या सर्व तक्रारी अतिशय गंभीर असून पुढील आठ दिवसांत या सर्व गावातील दारू विक्री पूर्ण थांबलीच पाहिजे व संगमनेर येथून येणारी दारू रोखण्याचे आदेश दिले. बैठकीस अकोल्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, उत्पादनशुल्क अधिकारी सहस्रबुद्धे, गटविकास अधिकारी अमर माने उपस्थित होते.
वरिष्ठांकडे तक्रार करणार
राजूर हे दारुबंदी असलेले गाव असूनही तेथील दारूविक्री थांबवण्याचे प्रयत्न होत नाहीत. शेंडी येथून खुलेआम दारू रोज येताना पोलीस निरीक्षक काहीच प्रयत्न करत नाही. राजूरच्या दारूबाबत पोलीस अधीक्षकांकडे स्वतंत्र तक्रार करणार असल्याचे हेरंब कुलकर्णी यांनी सांगितले.