अकोले : गेल्या तिन दिवसातील मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात ४ टीएमसी वाढ झाली. निळवंडे धरणातही नविन पाणी येण्यास सुरवात झाली. पाणलोट क्षेत्रात आज, शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला. तर पूर्व भागात पावसाने विश्रांती घेतली.
दोन दिवस धरणांच्या पाणलोटात मुसळधार पावसाची सततधार सुरू होती. कळसुबाई रतनगड परिसरातील पावसामुळे भंडारदरा धरण साठ्यात मोठी वाढ झाली. सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत ७६० दलघफु नविन पाणी आले. आज सकाळी पाणीसाठा ३ हजार ९९४ दलघफु होता. वाकी तलाव भरल्यामुळे कृष्णवती ही प्रवरेची उपनदी वाहती झाली. त्यामुळे निळवंडे धरणातही नवीन पाणी येऊ लागले. चोवीस तासात धरणात २३८ दलघफू पाण्याची भर पडली. सकाळी निळवंडेचा साठा २ हजार ८६३ दलघफू होता. आढळा नदी वाहू लागल्यामुळे आढळा धरणात ९६ दलघफू नविन पाणी आले. हे धरण ६३.६८ टक्के भरले आहे.
पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुळा नदीची पाणीपातळी आज कमी झाली. सकाळी कोतुळ येथील विसर्ग ६ हजार ९५१ क्युसेक होता तर धरणाचा पाणीसाठा ९ हजार ४९४ दलघफू झाला होता. सकाळपर्यंतच्या चोवीस तासातील पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- भंडारदरा १४०, घाटघर १४३, पांजरे १०८, रतनवाडी १५७, वाकी ११६, निळवंडे ५३, आढळा १३, अकोले ४६, कोतुळ ४४.