अलिबाग : अलिबागच्या ठाकूर कुटूंबात नेमकं चाललेय तरी काय असा प्रश्न सध्या तमाम अलिबागकरांना पडला आहे. कारणही तसेच आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाकूर कुटूंबातील दोन भावंडांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. तर रविवारी ठाकूर कुटूंबातील अन्य दोन भावंडानी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपण माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा वारसा पुढे चालवणारअसल्याचे जाहीर केले.

एक भाऊ शिवसेना उध्दव ठाकरे गटात युवासेनेचा जिल्हाप्रमुख आहे. मात्र त्याच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकूर कुंटूबात नेमकं कुटूंबाचे राजकारण नेमकं कोणत्या दिशेने जात आहे असा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे.

काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावर काम केलेल्या अँड प्रविण ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शनिवारी प्रवेश केला. यावेळी त्यांचे बंधु रवि उर्फ नाना ठाकूर, काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या कविता प्रविण ठाकूर, नमिता ठाकूर, काजल ठाकूर हे ठाकूर कुटूंबियही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झाले.

या पक्षप्रवेशाला चोवीस तास पूर्ण व्हायच्या आत रविवारी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदावर काम केलेल्या राजेंद्र मुधकर ठाकूर आणि उमेश मधुकर ठाकूर, समीर मधुकर ठाकूर आणि मधुकर ठाकूर यांचे लहान भाऊ रविंद्र ठाकूर यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन आम्ही मधूकर ठाकूर आणि काँग्रेस यांचा वारसा पुढे चालवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ठाकूर कुटूंबात राजकीय वाटचालीवरून फूट पडल्याचे दिसून येत आहे.
महत्वाची बाब म्हणजे मधुकर ठाकूर यांचे सर्वात लहान चिरंजीव अमीर ठाकूर हे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत.

त्यांच्याकडे युवासेनेचे जिल्हाप्रमुख पद आहे. त्यांच्या पत्नी काजल अमीर ठाकूर या मात्र प्रविण ठाकूर यांच्या सोबत शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाल्या आहेत. कुटूंबातील सून असलेल्या श्रध्दा महेश ठाकूर यांची नुकतीच काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झाली आहे.
त्यामुळे ठाकूर कुटूंबातील सदस्य तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षात कार्यरत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे ठाकूर कुटूंबाचे राजकारण नेमकं कुठल्या दिशेने सुरू आहे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

शेकाप मधून बाहेर पडत कै. मधुकर ठाकूर यांनी १९९० च्या दशकात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांचा राजकीय उत्कर्ष झाला. आधी जिल्हा परिषदेवर आणि नंतर २००४ मध्ये विधानसभेवर मधुकर ठाकूर निवडून गेले. अलिबाग मतदारसंघात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात त्यांचे मोठे योगदान त्यांनी दिले होते. ठाकूर यांचा शब्द अलिबाग मधील काँग्रेससाठी प्रमाण मानला जायचा. मात्र मधुकर ठाकूर त्यांच्या पश्चात कुटूंबातील सदस्यांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना जवळ केल्याचे सध्या पहायला मिळत आहे.