अलिबाग– पूर्ववैमनस्यातून ५ जणांवर जिवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणात, रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप विठ्ठल भोईर उर्फ छोटम शेट यांच्या सह २१ जणांना अलिबागच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सर्वांना सात वर्ष सक्त मजूरीची शिक्षा आणि प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे ११ सप्टेंबर , २०१२ रोजी ही घटना घडली होती. पूर्व वैमनस्यातून दिलीप भोईर यांच्यासह २५ जणांनी विटेक काँम्पूटर इन्स्टीस्टूट वर हल्ला केला होता. क्लासची तोडफोड करण्यात आली होती. यावेळी पाच जणांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी रुपाली विजय थळे यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या तक्रारी नुसार तत्कालिन समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मांडवा सागरी पोलीसा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय केदारे आणि त्यांचे सहकारी श्री. गावीत आणि श्री. मदने यांनी या प्रकरणाचा तपास करून अलिबाग सत्र न्यायालयात २०१३ मध्ये सर्व आरोपीं विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सांवत यांच्या न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली. या खटल्या मध्ये विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून अँड. प्रसाद शांताराम पाटील यांनी काम पाहीले. तर आरोपींच्या वतीने अँड मानसी म्हात्रे यांनी बाजू मांडली.

सुनावणी दरम्यान एकूण १५ जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या, ज्यात तक्रारदार, जखमी साक्षीदार, पंच, तापसिक अमंलदार, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने, सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि दिलीप भोईर यांच्या समवेत २१ जणांना भादवी कलम ३०७ सह अन्य कलमांखाली आरोपींना दोषी ठरवले, आणि सात वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. दरम्यान दिर्घकाळ चाललेल्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयात मोठी गर्दी झाली होती, या वेळी न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.