लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

अलिबाग : रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेल्या अलिबागचा पांढरा कांदा यंदा काढणीस सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या सात ते आठ दिवसात हा कांदा आता विक्रीसाठी बाजारात विक्रीसाठी उपलब्‍ध होणार आहे. निसर्गाने साथ दिल्याने दरवर्षीच्या तुलनेत कांदा यंदा लवकर बाजारात येणार आहे.

अलिबाग तालुक्यातील प्रामुख्याने नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या चार गावांमध्ये पांढऱ्या कांद्याचे पिक घेतले जात असे. त्यानंतर आलिबाग तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड होऊ लागली आहे. पूर्वी १०० हेक्टरवर या कांद्याची लागवड होत असे, मात्र वाढती मागणी आणि चांगला दर मिळत असल्याने कांदा लागवडीचे क्षेत्र २४५ हेक्टर पर्यंत विस्तारले आहे.

आणखी वाचा-“मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त…”; देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला

रायगड जिल्ह्यात खरीप हंगामात भात पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते मात्र रब्बी हंगामात सिंचन क्षेत्र वगळता फारशी पिक घेतली जात नाही. जिल्ह्यात ओलिताखालील क्षेत्र फारसे नसल्याने दुबार आणि तिबार शेती जवळपास केली जात नाही. पण अलिबाग तालुका त्याला अपवाद ठरतो. भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकतो. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात.

यंदा अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्यांना त्रास दिला नाही. त्‍यामुळे पुर्नलागवड करावी लागली नाही. कांद्याच्या पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भावही झाला नाही. यामळे यंदा कांद्याचे पीक जोमात येईल आले आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दाखल होणारा कांदा यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांद्याला चांगला भाव मिळण्‍याचीही आशा शेतकऱ्यांना आहे. सध्‍या काढणीचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी कांदा वाळण्‍यासाठी ठेवला आहे. नंतर वेण्याबांधून कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवला जाणार आहे.

आणखी वाचा-“मला दोन वेळा भाजपाची ऑफर..”, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; प्रणिती शिंदेंबाबत बोलताना म्हणाले…

पांढऱ्या कांद्यातील औषधी गुणधर्म

अभ्यासकांच्या माहितीनूसार या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. कांद्यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो अॅसिड हे घटक असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढऱ्या कांद्याला मागणी वाढली आहे. मुंबई पुण्यासारख्या महानगरातून कांद्यासाठी मोठी मागणी केली जात आहे. यंदा हवामान चांगले होते. त्यामुळे पिकही जोमाने आले आहे. येत्या काही दिवसात कांदा बाजारात मुबलक प्रमाणात दाखल होईल. -सतीश म्‍हात्रे, शेतकरी, कार्ले