राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास राज्यसभा निवडणुकीचे उमेदवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपाचे आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले आहेत.
हेही वाचा- Rajya Sabha Election: महाविकास आघाडीला धक्का; नवाब मलिकांना तातडीने दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
मतदानानंतर आकडे स्पष्ट
आजच्या मतदानानंतर सगळ्यांनाच हे आकडे स्पष्ट दिसतील, असेही राऊत म्हणाले. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या अगोदर काँटे की टक्कर, चूरससारखे वातावरण निर्माण करण्यात आले होते हे चूकीचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला १६९ आमदरांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमचे चारही उमेदवार विजयी होतील. त्यात एक दोन शिवसेनेचे, एक काँग्रेसचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असे राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीत नाराजी नाही
राज्यसभा निव़डणूक मतदानासाठी काही तास शिल्लक असतानाच महाविकास अघाडीच्या रणनितीत मोठा बदल करण्यात आला. शरद पवारांनी ऐनवेळी मताचा कोटा ४२ वरून वाढवून ४४ केला आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान
राज्यसभेच्या ६ जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी ईडीकडे विनंती अर्ज केला होता. मात्र, त्यांना अजून मतदानाची परवानगी देण्यात आली नाही. घटनेने या दोघांना मतदानाचा अधिकार दिला आहे. तरीही त्यांना अधिकार मिळत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.