सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये सध्या खूप गतीने काम करीत आहेत. त्यांच्या एवढ्या गतीने काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दुसरा कोणीही झालेला नाही. सध्यातरी असे नेतृत्व राज्यात नाही, म्हणून त्यांना अडविण्यासाठी विरोधक मंत्र्यांवर आणि आमदारांवर वेगवेगळे आरोप करत असल्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाई येथे सांगितले.

येथील मराठी विश्वकोश कार्यालयासाठी इमारतीसाठी जागेची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मराठी विश्वकोशाचे सहसचीव शामकांत देवरे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजीत भोसले, पुरुषोत्तम जाधव, विकास शिंदे, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – “…तर काँग्रेस केवळ निवडणूक पोस्टरवरच उरेल”, सुनील केदारांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना इशारा

राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे शिवसेना फोडण्याचे स्वप्न होते त्याप्रमाणे त्यांनी शिवसेना फोडली. पण उद्या राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली तर राज्यात कोणाला आश्चर्य वाटायला नको, असे केसरकर म्हणाले. शिंदे गटाच्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर वेगवेगळे आरोप होत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले कोणीतरी कट कारस्थान केले म्हणून आरोप होऊ शकतात, पण आरोप केले म्हणजे तो मनुष्य दोषी, असे होत नाही, असे ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती नसून तो एक विचार आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. बाळासाहेबांचे स्वाभिमानी विचार जपणाऱ्या आमच्या गटालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे ही कोणाची खाजगी प्रॉपर्टी नव्हती, तर ते महाराष्ट्राचे व संपूर्ण देशाचे होते. आम्ही युती म्हणून निवडून आलो आहोत, मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार सोडून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तुमच्या इतकीच मलाही उत्सुकता आहे. आमच्या पक्षाकडे नव्वद टक्के आमदार खासदार आहेत. त्यांच्या मतांचा विचार न्यायालय व निवडणूक आयोगही करेल असेही केसरकर म्हणाले.

हेही वाचा – वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराची घोषणा; हॅलो मेडिकल फाऊंडेशनसह ‘हे’ ठरले मानकरी

मराठी विश्वकोश कार्यालयासाठी

नव्याने आद्ययावत इमारत उभारणार असल्याचे व त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वकोशाची स्वतःची इमारत पूर्ण होईल त्याचवेळी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे खरे स्वप्न पूर्ण होईल. शासन मराठी भाषेचा आणि विश्वकोशाचा प्रचार आणि प्रसार जगभर होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातूनच नुकतेच मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. शांती निकेतनच्या धर्तीवर विश्वकोशाचा विकास करणार, असेही केसरकर म्हणाले.