राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. करोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून, आता या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जावी अशी मागणी केली होती, ती पंतप्रधान मोदींनी मान्य केली होती. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आजच्या पत्रात आभार व्यक्त केले असून, लसीकरणाचा वयोगट आणखी कमी करावा, अशी विनंती केली आहे. याशिवाय लसींचा पुरवठा देखील वाढण्याची मागणी केली आहे. तरूण वर्ग मोठ्यासंख्येने कामासाठी घराबाहेर पडत असतो, जर त्यांना लसीकरण झाले तर रूग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे करोना परिस्थितीची माहिती मांडलेली आहे. याशिवाय चाचण्यांचा वेग देखील वाढण्यात आलेला आहे. प्रत्येक करोनाबाधित बरा झाला पाहिजे या हेतूने आम्ही उपाययोजना करत आहोत. मागील वर्षीच्या तुलनेत अधिक घातक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ब्रेक द चेन या मोहीमेद्वारे काही कडक निर्बंध लागू केले आहेत. परंतु, जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहणार आहे. याशिवाय आरोग्याचे सर्व नियम सर्वजण पाळतील अशी कार्यपद्धती ठरवण्यात आली आहे. लसीकरण मोहीम राज्याने अतिशय गांभीर्याने घेतली असून, काल ४ एप्रिलपर्यंत ७६.८६ लाख जणांना लस देण्यात आलेली आहे. ३ एप्रिल रोजी राज्यात सर्वाधिक ४.६२ लाख जणांना लसीकरण केले गेले.

याचसोबत मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितले आहे की, लसीकरण वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु त्यासाठी केंद्र सरकारने अधिक डोसचा देखील पुरवठा करावा. मंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या सर्वाधिक रूग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांसाठी केवळ तीन आठवड्यात ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी असून, यासाठी दीड कोटी डोस मिळावेत, अशी मागण देखील करण्यात आलेली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allow everyone under the age of 25 to be vaccinated chief minister thackerays important demand to modi msr
First published on: 05-04-2021 at 21:16 IST