लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : काल गुरूवारी राज्यात सर्वाधिक ४१.१ अंश सेल्सियस तापमान सोलापुरात मोजले गेले असताना शुक्रवारी दुसऱ्या दिवशी त्यात किंचित घट होऊन ४२.४ अंशांपर्यंत तापमानाचा पारा खाली उतरला असला तरी उष्णतेची धग कायम आहे. सकाळपासूनच उष्म्याची तलखी जाणवत असून उष्माघात होऊन नये म्हणून नागरिकांकडून स्वतःहून उपाययोजना केल्या जात आहेत.

वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक कामांशिवाय घरातून बाहेर पडणे टाळले जात असून शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये कामांसाठी होणारी नागरिकांची वर्दळ बऱ्याच अंशी घटल्याचे दिसून येते. कार्यालयांमध्येही उष्म्याचा त्रास जाणवू नये म्हणून कूलर यंत्रांचा वापर वाढला आहे. बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी सायंकाळनंतर होताना दिसून येते.

आणखी वाचा-पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांना आपलीची मक्तेदारी असे वाटते- संजय राऊत

मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत २६ रोजे पूर्ण झाले आहेत. निर्जल उपवास करताना लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत नागरिकांनी रोजे केले आहेत. अंगाची काहिली होणा-या कडक उन्हाळ्यात १३ तासांपर्यंत अन्न आणि पाण्यावाचून रोजे करताना उपासकांची जणू कसोटी लागत आहे.

वाढत्या कडक उन्हाळ्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाचे संकट अधिक गहिरे होत असून सध्या ३८ गावांना ४२ टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु शासनाच्या मालकीचे १६ टँकर असताना त्यापैकी १२ टँकरसाठी चालकच उपलब्ध नाहीत, अशी माहितीही समोर आली आहे. यासंदर्भात पुणे विभागीय महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पलगुंडवार यांनी सोलापुरात घेतल्या आढावी बैठकीत टँकरचालक तात्काळ उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले. बार्शी, माळशिरस आणि सांगोला या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती गंभीर असून करमाळा व माढा तालुक्यात दुष्काळाची स्थिती मध्यम स्वरूपाची आहे. इतर ५५ महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.