Ambadas Danve 5 quetions to CM Devendra Fadnavis Over Parth pawar in Rs 300 cr land deal controversy : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन खरेदी व्यवहारात प्रकरणात गंभीर आरोप होत आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी करण्यात आली. तसेच या व्यवहार प्रकरणात केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची चौकशी होईल असे म्हटले आहे. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी दोन वाक्यात उत्तर देऊन हा विषय मुख्यमंत्र्यांना संपवता येणार नाही असे म्हटले आहे.
अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी फडणवीसांना काही प्रश्न विचारले आहेत. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या भोसरी जमीन प्रकरणातील आरोपांचा संदर्भ त्यांनी दिला आहे.
दानवे नेमकं काय म्हणाले?
अंबादास दानवे म्हणाले की, “भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन घेतल्याचा आरोप झाला तेव्हा ईडी कडून मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार प्रकरणाची चौकशी लावली आहे. मात्र दोन वाक्यात उत्तर देऊन हा विषय मुख्यमंत्री महोदयांना संपवता येणार नाही.. त्यांच्यासाठी हे काही प्रश्न….
१. एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई झाली त्याच पद्धतीने कोरेगाव पार्क प्रकरणात सरकार कारवाई करणार का?
२. सावळ्या गोंधळात व्यवहार झालेला दिसत असताना हा व्यवहार सरकार रद्द करणार का?
३. ज्या उद्योग विभागातील महोदयांनी स्टॅम्प ड्युटी माफ केली, त्यांची चौकशी सरकार करणार का?
४. सदर चौकशी कोण करणार? संबंधित लोकांचे नाव आपण केव्हा महाराष्ट्राला सांगणार?
५. या चौकशीला टाईम बाऊंड करणार का? याचा अहवाल कधीपर्यंत येणे महाराष्ट्राने अपेक्षीत धरावा?”
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले. फडणवीस म्हणाले की, “सदर प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड्स याची सर्व माहिती मागितली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहेत. सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी जे सांगायचे ते सांगेन.”
“अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे. त्यादृष्टीने आज माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई काय आहे, त्याबाबत दिशा स्पष्ट करू,” असे फडणवीस म्हणाले आहेत.
अजित पवारांच्या भूमिकेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, “उपमुख्यमंत्रीही (अजित पवार) अशा कुठल्याही प्रकाराला पाठिशी घालतील असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. अनियमितता झाली आहे का? हे पडताळून पाहिले पाहिजे. अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.”
