Ambadas Danve on Parth Pawar Land Deal Case: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमीन खरेदी प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. यादरम्यान अजित पवारांनी आज माध्यमांसमोर येत या प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही. विरोधकांनीही मोठ मोठे आरोप केले. पण मला मिळालेल्या माहितीनुसार, जो व्यवहार झाला होता, तो रद्द करण्यात आला आहे, असे अजित पवार म्हणाले. यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने महार वतन असलेल्या ४० एकर जमिनीची खरेदी केल्याचे बोलले गेले. या खरेदी व्यवहाराचे कोट्यवधीचे मुद्रांक शुल्कही भरलेले नाही, असा आरोप करण्यात आला. या कंपनीत पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी असताना त्यांना गुन्ह्यातून वगळण्यात आल्यावरून अंबादास दानवेंनी सरकारवर प्रश्न विचारले आहेत.
अंबादास दानवेंचे म्हणणे काय?
अंबादास दानवे म्हणाले की, “माझा साधा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली, चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला, जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का? असा माझा प्रश्न आहे. त्यामुळे असा व्यवहार रद्द केला म्हणून प्रश्न सुटणार नाही. या प्रकरणात पार्थ पवारांचं नाव का नाही? त्याला कारण दिलं जातं ते सही करायला गेले नव्हते… ती कंपनी आहे, कंपनीवर गुन्हा दाखल करा. ९९ टक्के शेअर पार्थ पवारांचे आणि एक टक्का शेअर पाटील यांचे आहेत.”
अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, “एक टक्का शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि ज्याचा ९९ टक्के शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही…. या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा. या कंपनीकडे ३०० कोटी कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे. सरकारी जमीन कशी विकली गेली? एक कायदा लागू केला होता, ज्यानुसार गुंठाभर जमीन देखील विकता येत नव्हती. यांनी सरकारी ४० एकर जमीन तिही पुण्यातील कोरेगाव पार्कमधील विकली. हे कसं होऊ शकतं?”
अजित पवारांनी राजिनामा दिली पाहिजे
“हे मोदींचं सरकार म्हणत होतं ना खाऊंगा ना खाने दूंगा… समजा हे प्रकरण उघड झालं नसतं तर? पचवली असती…. पार्थ पवार मालक झाले, एक टक्का वाल्या त्या पाटलाला त्यांनी जमीन दिली असती का? म्हणाले असते की ९९ टक्के शेअर माझा आहे. त्यामुळे राज्य सरकार बनवाबनवी करत आहे. याच्यात पार्थ पवार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे, “असेही दानवे म्हणाले.
पार्थ पवारांचे गुन्ह्यात नाव का नाही?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेत पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर बोलत असताना अजित पवार म्हणाले की, जे लोक व्यवहाराच्या नोंदणीसाठी कार्यालयात आले होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
