राहाता : देशात सहकार क्षेत्रात प्रथमच सीएनजी निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. मोदी सरकार यापुढे देशातील निवडक १५ साखर कारखान्यांना असे प्रकल्प उभारण्यासाठी एनसीडीसीच्या माध्यमातून साहाय्य करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी कोपरगावमध्ये बोलताना दिली. कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सुरू केलेल्या ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ (सीएनजी) व ‘स्प्रे ड्रायर पाेटॅश ग्रेन्युअल’ प्रकल्पाचे उद्घाटन आज, रविवारी शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे उपस्थित होते. देशामध्ये डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता साधण्यासाठी केंद्र सरकारने ‘डाळ उत्पादन आत्मनिर्भरता मिशन’ सुरू केले. त्यासाठी पुढील सहा वर्षांसाठी ११ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच नाफेड व एनसीसीएफकडे नोंदणी असलेल्या खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किमतीनुसार पिकांची खरेदी केली जाणार आहे. केंद्र सरकारने मसूर, मूग, मोहरी, हरभरा, तुरीसह ज्वारी, सोयाबीन, कापूस व गहू यांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केल्याचे सांगून शहा म्हणाले याशिवाय १ हजार प्रोसेसिंग युनिट स्थापन करून ३८ लाख शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे किट वितरीत करण्यात येतील. शेतकऱ्यांना याचा खऱ्या अर्थाने लाभ होईल.
ज्यावेळी देशातील १४० कोटी लोक विकत घेणार आणि व्यापारी विदेशी वस्तू विकणार नाही, असे जेव्हा ठरवतील, तेव्हाच भारत देशाची अर्थव्यवस्था जगात एक नंबरवर जाईल. स्वदेशी वस्तूंचा स्वीकार सर्वांनी केल्यास भारत आत्मनिर्भर होणे शक्य असल्याचे अमित शहा म्हणाले.
साखर कारखान्यांचे अर्थचक्र पुढे नेण्याचे काम महाराष्ट्राने पुढे नेले पाहिजे. केंद्रात आम्ही तीन वर्षांपूर्वी सहकार मंत्रालय स्थापन केले त्यावेळी त्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र त्यातून आम्ही मात्र विरोधकांचा अंदाज चुकीचा ठरवला असल्याचा दावा करून देश आता सहकारातून मोठे यश मिळवले असून आगामी काळात देश जगात चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर लवकरच जाणार असून तो काळ फार दूर नाही. स्व. शंकरराव कोल्हे यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकरी हा अन्नदाता आहे, तो ऊर्जादाता झाला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आहेत. तेच विचार रुजविण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून सुरू आहे. साखर भावातील चढ-उतारामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपपदार्थ निर्मिती महत्त्वाची ठरते. पेट्रोल, डीझेल, कोळसा यामुळे पर्यावरणावर तसेच शेतीवर परिणाम होतो. त्यामुळे नैसर्गिक ऊर्जास्रोतांना प्राधान्य दिले पाहिजे. ऑरगॅनिक वेस्टवर प्रक्रिया करून गॅस तयार केला जातो, गॅस तयार करताना जे वेस्ट निघाले त्यापासून पोटॅश तयार केले जात आहे. हा देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला बळकट करणारा प्रयोग आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हे कारखान्याचा सीएनजी प्रकल्प भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणारा आहे. सहकारात नवीन प्रयोग झाले पाहिजे, असा अमित शहा यांचा ध्यास असतो, सहकाराला ऊर्जा देण्याचे काम शहा करीत आहेत. अजित पवार म्हणाले की, कोल्हे कारखान्याने आजवर विविध उपपदार्थ निर्मिती करून वेगळी क्रांती घडविली आहे. इतर कारखान्यांनीही त्याचे अनुकरण करावे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विवेक कोल्हे यांनी केले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आभार मानले.