शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. दिल्लीत त्यांना महादजी शिंदेंच्या नावाने असलेला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. साहित्य संमेलनात घडलेल्या या सत्कार सोहळ्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार यांनी दिल्ली एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्र तोडणाऱ्या अमित शाह यांचा सत्कार केला अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. या टीकेला आता खासदार अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं राजकारण फार विचित्र दिशेने चाललं आहे. कोण कोणाला टोप्या घातलंय आणि कोणाच्या टोप्या उडवतंय, हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल. ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे.”

ज्यांनी शिवसेना फोडली अशांचा सन्मान केल्याने आम्हाला वेदना-राऊत

“ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगू होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो”, असंही संजय राऊत म्हणाले. आता संजय राऊत यांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी उत्तर दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांना इतका त्रास होत असेल तर…

संजय राऊत यांची एक भूमिका नक्कीच असू शकते. मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे. शरद पवारांनी स्टेटमनशिपचं उदाहरण घालून दिलं आहे. महाराष्ट्र त्यासाठी ओळखला जातो. संजय राऊत यांचं वैयक्तिक मत काहीही असू शकतं पण या सत्कारात काही गैर आहे असं मला वाटत नाही. शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत त्यामुळे ते त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठिशी ते ठामपणे उभे आहेत. इथे राजकीय भूमिका न घेता स्टेटमनशिपचा आदर्श घालून दिला. संजय राऊत यांच्याकडे वेगळी माहिती असेल तर मला माहीत नाही. साहित्य संमेलनाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे उत्साह कायम आहे. जे राज्याबाहेरचे मराठी लोक आहेत त्यांनाही या संमेलनामुळे आनंद झाला आहे. दिल्लीत साहित्य संमेलन होण्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही त्यांनी प्रयत्न केले आहेत. राजकारण आम्हाला कळतं असं राऊत म्हणाले पण ते उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारकं आहे. शरद पवारांच्या राजकारणावर बोलण्याची उंची फार कमी लोकांची आहे. शरद पवारांना किती राजकारण कळतं हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही. राऊत यांना इतकं दुःख असेल तर त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे की उद्धव ठाकरेही अजित पवारांना भेटले होते. आपण याला स्टेटमनशिप म्हणून बघू, प्रत्येकवेळी राजकाण आणलं तर अवघड होईल असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. अमोल कोल्हेंनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला तेव्हा हे विधान केलं आहे.