अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांच्या एका विधानावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘अजित पवार तन-मन-धनानं काम करत असल्यानं सुप्रिया सुळे बारामतीतून निवडून येतात,’ असं विधान अमोल मिटकरींनी व्यक्त केलं होतं. तर, ‘आम्ही धनाचं राजकारण करत नाही,’ असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं होतं. यानंतर मिटकरींनी सुप्रिया सुळेंची माफी मागितली आहे.

नेमकं प्रकरण काय?

“खासदार सुप्रिया सुळेंचं एक भाषण ऐकलं. त्या भाषणात सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, फार कमी बहिणी अशा आहेत, ज्यांच्या पाठिशी भाऊ उभा राहतो. मी त्यांच्या मताचं १०० टक्के समर्थन करतो. कारण, बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी तन-मन आणि धनाने अजित पवारांसारखा भाऊ सुप्रिया सुळेंच्या पाठिशी आहे. म्हणून सुप्रिया सुळे अनेक वर्षांपासून लोकसभेमध्ये निवडून येतात,” असं विधान अमोल मिटकरींनी केलं होतं.

हेही वाचा : “एकनाथ शिंदेच पुढं मुख्यमंत्री राहावेत, तर देवेंद्र फडणवीसांनी…”, शिंदे गटातील नेत्याचं मोठं विधान

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं तन-मन लावून नेहमीच लढाई लढली आहे. मात्र, धनाचं राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि करणार नाही. अमोल मिटकरींचा गैरसमज आहे की, आम्ही धनानं निवडणूक लढतो. त्यांचं मला माहिती नाही. पण, अजित पवार आणि मी आजवर धनानं निवडणूक लढलो नाही.”

यानंतर मिटकरींनी सुप्रिया सुळेंची माफी मागितली आहे. अमोल मिटकरींनी म्हटलं, “धनानं हा शब्द वापरल्यानं सुप्रिया सुळेंना वाईट वाटलं. सहज आपण, तन-मन आणि धन उच्चारतो. सुप्रिया सुळेंनी संसदेत महिला आरक्षणावर अभ्यासपूर्ण केलेल्या भाषणाचा दाखला वाशिममध्ये देत होतो. पण, तेवढाच व्हिडीओ सुप्रिया सुळेंना दाखवण्यात आला. त्यातून सुप्रिया सुळेंचा गैरसमज झाला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर असल्यानं नाराजीच्या चर्चा, अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “आरे बाबा…”

“गैरसमजामुळे सुप्रिया सुळेंना वाईट वाटलं. एक भाऊ म्हणून मी सुप्रिया सुळेंची माफी मागतो. पक्षात दोन गट दिसले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे. सुप्रिया सुळेंशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण, संपर्क झाला नाही,” असं अमोल मिटकरींनी सांगितलं.